पुणे – लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 323 डी 2 पुणे सुप्रीमतर्फे दिला जाणारा ’पर्यावरण भूषण पुरस्कार’ लायन्स क्ल्ब ऑफ इको फ्रेन्ड्सचे संस्थापक अध्यक्ष अनिल मंद्रुपकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनिल मंद्रुपकर बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर काम करीत असतानाही आठवड्यातील शनिवार, रविवारी पर्यावरणासाठी देत आहेत. वंदना चव्हान यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 12 वर्षे त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. मंद्रुपकर यांनी 2006 मध्ये लायन्स क्लब ऑफ इको फ्रेन्ड्सची स्थापना करून या क्लबमार्फत पर्यावरण संवर्धनासाठी काम सुरु केले. खेडशिवापूरजवळील आर्वी गावात 110 शौचालये बांधून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आर्वी गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.
शाळेतल्या विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाच्या कामात सहभागी करुन घेण्यासाठी इको फ्रेंड्समार्फत त्यांनी कॅच देम यंग हा कार्यक्रम हाती घेतला आहे. ओला व सुका कचरा वर्गीकृत करुन प्लास्टिकवर निर्बंध आणण्याचाही त्यांचा सदैव प्रयत्न असतो. त्याचबरोबर झीरो गार्बेज, एक दिवस सार्वजनिक वाहतुकीने प्रवास अशी उपक्रम ते राबवतात. 2015 पासून लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंड्सतर्फे स्वच्छ आणि स्मार्ट स्वारगेट उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. वनराई, हरितदूत, वसुंधरा स्वच्छता अभियान, जलबिरादरी, एनएससीसी, अलर्ट आदी संस्थांबरोबर पर्यावरण कार्यात सहभागी असतात. यंदा एक तास स्वच्छतेसाठी, माझा रस्ता-स्वच्छ रस्ता, नो व्हेईकल डे, कचरा वर्गीकरण आदी उपक्रम लायन्स क्लब व पर्यावरण विषय काम करणाऱ्या संस्थाबरोबर राबविले जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या सातत्याने पर्यावरण कार्याच्या योगदानामुळेच त्यांना पर्यावरण भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानाचे गेली दोन वर्षापासून काम पाहत आहेत. या पुरस्कारामुळे आणखी जोमाने काम करण्याची उर्जा मिळाल्याचे मंद्रुपकर म्हणाले.