पुणे – पुणे विभागातील हॉटेल व्यावसायिकानी त्यांच्या व्यवसायाची वृध्दी करताना अन्न सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन (म.रा) मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज येथे केले. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आज अन्न व औषधे प्रशासनाच्या वतीने अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम 2006 अंतर्गत सुरक्षित अन्नपदार्थ उत्पादन,साठवण,हाताळणी व विक्रीबाबत हॉटेल,रेस्टॉरन्ट,केटरर्स व्यावसायिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होत, त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री बापट यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये हॉटेल व्यवसाय करणा-यांकरीता अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. हॉटेलमध्ये जेवणाकरीता आल्यावर ग्राहकांकडून तात्काळ जेवणाचा दर्जा ठरविला जातो. व त्याचा व्यवसायवृध्दीवर परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यामुळे जेवण तयार करताना पदार्थांची गुणवत्ता राखण्याबरोबरच तेथे स्वच्छतेबाबत जे नियम ठरविले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंशिस्त बाळगावी, त्यामुळे ग्राहकांचेही समाधान होईल. व एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली जाईल. हॉटेल व्यावसायिकांना येणा-या अडी अडचणींचा निपटारा होण्याकरीता त्यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तसेच इतर वेळीही या विभागामार्फत सहकार्य होणार असल्याचे सांगितले.
हॉटेल व्यवसाय करताना कच्चा माल खरेदी ते पदार्थ तयार होईपर्यंत पाळावावयाचे नियम याबाबत माहिती देण्याकरीता अन्न व औषधे प्रशासनाच्या तसेच पुणे रेस्टॉरन्ट ॲन्ड हॉटेलियर्स असोशिएन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार हॉटेल व रस्त्यांवरील व्यवसाय करणा-यांकरीता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे या उद्देशाने करण्यात आलेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अन्न व औषधे प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी पुणे विभागामार्फत मागील महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या या जनजागृती मोहिमेबाबत माहिती दिली. पुणे विभागाच्या 300 मंदिरामधील साधारणत 3500 विश्वस्तांना त्यांच्या मंदिरामार्फत वाटण्यात येणारा प्रसाद तयार करताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. तर पुढील 3 महिन्यात 40 ते 50 हजार हॉटेल व्यावसायिकांना याबाबत प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. हॉटेल व्यवसायामध्ये 12 लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणा-यांकरीता लायसन्सची तर त्याखालील उलाढाल असणा-या व्यावसायिकांना नोंदणीची आवश्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेच्या आयोजनावेळी गणेश शेट्टी, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन व किशोर सरपोतदार, सचिव, हॉटेल असोशिएशन यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजनाकरीता सह आयुक्त (पुणे विभाग) शिवाजी देसाई, सं.मा.देशमुख व इतर अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले. यावेळी मोठया संख्येने हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.