श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे शिवजयंतीनिमित्त जीवंत देखावा
पुणे : बलाढय अफजलखानाने महाराष्ट्रात तुळजापूर, पंढरपूरवर केलेला हल्ला… स्वराज्यावर ओढावलेल्या संकटामुळे चिंताग्रस्त झालेल्या राजमाता जिजाऊंच्या मनाची घालमेल… मावळ्यांसोबत शिवरायांनी अफजलखानाचा सामना करण्याकरीता आखलेली रणनिती आणि चतुर युद्धनितीने केलेला अफजलखान वधाचा चित्तथरारक प्रसंग तब्बल ५० कलाकारांनी रंगमंचावर जीवंत केला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने कोतवाल चावडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त शिवरायांची युद्धनिती या जीवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, अभिजीत कोद्रे, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, विशाल केदारी, सचिन आखाडे, अतुल चव्हाण आदी उपस्थित होते. उत्सवाचे ७६ वे वर्ष होते.
गोंधळींनी केलेल्या सादरीकरणातून शिवरायांची अफजलखान वधाची युद्धनिती उपस्थितांनी अनुभविली. सुमारे ४० बाय ४५ फूट आकाराच्या दुमजली रंगमंचावर सदाशिव पेठेतील श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठानच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. याकरिता प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश लोणारे, पराग बोहोडकर, अतुल दळवी, धनजंय साठे यांनी विशेष मेहनत घेतली. महानाटयापूर्वी युवा शाहीर प्रतिक लोखंडे यांनी पोवाडा सादर केला. तर, नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टतर्फे वादकांनी शिवरायांच्या चरणी वादनसेवा अर्पण केली.