पुणे – पिंपळे सौदागर येथील वस्ताद पै. अर्जुन दत्तोबा काटे यांना पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘जीवन गौरव पुरस्कार 2017’ जाहीर झाला आहे. वस्ताद अर्जुन दत्तोबा काटे हे एलआयसीतील निवृत्त कर्मचारी असून कुस्ती क्षेत्राबरोबरच सांप्रदायीक क्षेत्रात देखील त्यांनी महत्वपुर्ण कार्य केले आहे. मुळ पिंपळे सौदागरचे असणारे काटे यांना त्यांचे चुलते पै. महादू रामचंद्र काटे यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून तालमीत सराव करीत कुस्तीचे धडे दिली. पुढे कै. वस्ताद देवराम काटे पाटील व वस्ताद सुलाबराव काटे पाटील, एचए तालमीचे वस्ताद राघोबा दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीतील डावपेच शिकले. पिंपरी
चिंचवडसह पंचक्रोशीतील अनेक आखाड्यात पै. बाळू सुतार, पै. राजाराम वाघोले, पै. कैलास चिल्हे, पै. सोपन कुदळे यांच्या बरोबरच्या वस्ताद पै. अर्जुन काटे यांच्या गाजलेल्या कुस्त्या आजही कुस्ती शौकीनांच्या स्मरणात आहेत. वस्ताद पै. अर्जुन काटे यांनी कुस्ती बरोबरच गावातील क्रांती कबड्डी संघाकडून खेळून कबड्डीत देखील आपला ठसा उमटविला आहे. पिंपळे सौदागर मधील शिव छत्रपती पुसस्कार विजेते माजी नगरसेवक शंकर काटे, विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या बरोबरच भानुदास काटे, किशन काटे, दत्ता कुंजीर, नामदेव काटे, बाळू कोकाटे, विजय जाचक, दिगंबर जगताप, नंदू भिसे, कैलास कुंजीर, विकास कुंजीर यांना देखील वस्ताद पै. अर्जुन काटे यांनी मार्गदर्शन केले आहे.