पुणे – अवयव निकामी झालेल्या रुग्णांना अवयवदानामुळे नवसंजीवनी मिळते, यासाठी सर्वांनी सामाजिक जाणीवेतून अवयवदानाचा संकल्प करायला पाहिजे, असे आवाहन ससून रुग्णालयाच्या जनऔषधशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.विकास क्षीरसागर यांनी केले.
शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकापयोगी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी गणेशोत्सव काळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादपर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हवेली तालुक्यातील नऱ्हेगाव येथील भैरवनाथ नवचैतन्य तरुण मंडळ (ट्रस्ट) येथे आयोजित करण्यात आलेल्या संवादपर्व कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. क्षीरसागर बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या जयश्री भूमकर,पंचायत समिती सदस्या ललिता कुटे, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान भूमकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती अधिकारी वृषाली पाटील, भैरवनाथ नवचैतन्य तरुण मंडळ (ट्रस्ट) चे अध्यक्ष अक्षय वाल्हेकर यावेळी उपस्थित होते.
डॉ. क्षीरसागर म्हणाले, अवयदानामुळे मृत्युनंतरही अवयव स्वरुपात जिवंत राहण्याबरोबरच गरजूंच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्याची संधी मिळते. यामुळे सामाजिक जाणिवेतून नागरिकांनी अवयवदान करण्यासाठी संकल्प करायला हवा. अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा रुग्णांना मोठया प्रमाणावर अवयवांची आवश्यकता असते. निसर्गाने मानवाला शरीराच्या रुपाने मोठी देणगी दिली आहे. अवयवाची निर्मिती करणे मानवाला अजून शक्य झाले नाही. अवयवदानामुळे रुग्णांना नवसंजीवनी मिळणार असल्याने, सर्वांनी अवयवदानाचा संकल्प करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. अवयवदानाचे स्वरुप, अवयवदानाची आवश्यकता, त्यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया तसेच अवयवदानाबद्दल समज- गैरसमज याबाबत डॉ.क्षीरसागर यांनी यावेळी शास्त्रोक्त मार्गदर्शन केले.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी संवाद पर्व कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी हेतू स्पष्ट करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजाची रुपरेषा सांगितली. जयंत कर्पे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले. कार्यक्रमास भैरवनाथ नवचैतन्य तरुण मंडळ (ट्रस्ट) चे अध्यक्ष अक्षय वाल्हेकर, उपाध्यक्ष नागेश खेडेकर, माजी अध्यक्ष दीपक वाल्हेकर, माजी उपाध्यक्ष अमर खेडेकर, लोकप्रतिनिधी, परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.