पुणे – गणेशोत्सव हा प्रत्येकामध्ये उत्साह निर्माण करणारा सण आहे. समाजासाठी प्रेमाने आणि मनाने मंडळांचे कार्यकर्ते पुणेकरांना अभिमान वाटेल असे काम वर्षभर करीत असतात. सेवा, कर्तव्य, त्याग या भावनेने काम करुन समाजापासून आलेला पैसा समाजिक कार्यासाठी मंडळे देत आहेत. अस्वच्छता आणि प्रदूषण या प्रश्नांबाबत मंडळांनी काम करायला हवे. तरच ती लोकचळवळ होऊन मोठी समस्या दूर होईल, असे मत डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात १२५ वर्षे गणेशोत्सवाची कार्यकर्त्यांवरील विश्वासाची या कार्यक्रमांतर्गत १२५ वर्षे पूर्ण झालेल्या गणेशोत्सव मंडळे व विधायक कार्य करणा-या ढोल-ताशा पथकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, अशोक गोडसे, चंद्रशेखर कपोते, समीर गांधी, शशांक पाटील, उमेश काची, प्रशांत वेलणकर, सुरेश पवार आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, उपरणे, पुस्तक देऊन मंडळांचा गौरव करण्यात आला.
अरुण खोरे म्हणाले, सध्या इतिहासाची मोडतोड आणि विद्रुपीकरण करण्याचे काम सुरु आहे. मात्र, लोकांसमोर योग्य इतिहास जायला हवा. त्यामुळे गणेशोत्सवाचा १२५ वर्षांचा इतिहास नव्या पिढीला समजण्याकरीता १२५ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळांनी आपापल्या मंडळांच्या इतिहासावर काम करायला हवे. त्यामुळे त्यापद्धतीने कार्यकर्त्यांनी त्वरीत जोमाने कामाला लागायला हवे.
अशोक गोडसे म्हणाले, गणेशोत्सवाच्या माध्यमातून तयार झालेले कार्यकर्ते देशाच्या राजकारणामध्ये अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार, खासदार, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आहेत. कार्यकर्त्यांना वेळोवेळी अनेकदा अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करीत सजावटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी नेहमीच सामाजिक प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे उत्सवाची वाटचाल मंडळापुरती मर्यादित न राहता लोकाभिमुख झाली.
मोहन जोशी म्हणाले, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या चळवळीला पुण्यातून सुरुवात झाली. हळूहळू या उत्सवाला विधायक वळण आले. मंडळाचे कार्यकर्ते केवळ उत्सवातील १० दिवस नाही, तर वर्षभर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. भोला वांजळे यांनी सूत्रसंचालन केले. संगीता तिवारी यांनी आभार मानले.