विवेक ताम्हणकर
आंबोली म्हटलं की, धबधबा आणि घनदाट धुकं आपल्याला आठवतं. जास्त पावसाचं पठार म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडीपासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावर वसलेल्या या आंबोलीच्या अंतरंगात डोकावल्यावर निसर्गाची अनेक रूपं थक्क करून टाकतात. यातही विविध झाडं आणि फुलं भटक्यांचं लक्ष वेधून घेतात.
हिरवे हिरवे गार गालिचे, हरीत तृणांच्या मखमालीचे ।
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ती खेळत होती ।।
अशा यथार्थ काव्य पंक्तीत बालकवींनी श्रावणातील निसर्गाचं वर्णन केलं आहे. कवितेतील हा निसर्ग कोकणात सध्या अनुभवायला मिळत आहे. सहयाद्री पर्वत अर्थात पश्चिम घाट हा गुजरातमधील तापी नदीच्या किना-यापासून कन्याकुमारीपर्यंत पसरला आहे. सध्या श्रावणातील हिरवळीची शाल पांघरलेला हा घाट जैवविविधतेने संपन्न आहे. याच पर्वतरांगेतील ‘आंबोली’ हे पठार सध्या सप्तरंगी फुलांच्या झालरीने लक्ष वेधून घेत आहे.
पश्चिम घाटाचा एक छोटासा भाग आंबोलीने व्यापला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ७५० मीटर उंचीवर आंबोली हे ठिकाण वसलेलं आहे. वर्षाला इथे ३,५०० मिलीमीटर पावसाची नोंद होते. इतक्या जास्त पावसामुळे इथलं जंगल हे निमसदाहरीत जंगल म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे या जंगलात घनदाट वृक्षराजी आणि त्याचा आधार घेत वावरणारे प्राणी, पक्षी मोठया प्रमाणात पाहायला मिळतात. आंबोलीतील हे वेगळेपण शोधण्यासाठी तसंच ते डोळय़ांत आणि मनात साठवण्यासाठी एके दिवशी सकाळीच आंबोली जंगलातील पायवाट तुडविण्याचा योग आला. श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. खळखळणारे ओढे आणि काटयाकुटयातली पायवाट तुडवत पुढे जाताना दाट धुक्यातही येथील फुलांची रंगबहार आणखीनच आकर्षक वाटत होती. पण त्यातही नाजूक ऑर्किड्सनी फुलांच्या या देखाव्यात विशेष भर टाकली होती.
‘डान्सिंग लेडी’ हा ‘ऑर्किड’ या फुलाचा प्रसिद्ध प्रकार पाहताना अचंबित झालो. पांढरे शुभ्र आणि वा-याच्या लहरींवर नृत्य करणारे ते फूल सहजच आपलं लक्ष वेधून घेतं. ‘डान्सिंग लेडी’ या ऑर्किड फुलाच्या प्रकाराप्रमाणे तिथे ‘वाइल्ड ऑर्किड्स’ही पाहायला मिळाली. छोटया नाजूक डहाळीवर जन्माला येणारं हे फूल परावलंबी नाही. त्यामुळे ते फूल आपल्याबरोबर इतरही प्रकारच्या फुलांना फुलण्यास वाव देतं. ऑर्किडबरोबर इथल्या विस्तीर्ण माळावर फुलणारी ‘सोनकी’ची फुलं सहजच लक्ष वेधून घेतात. कोकणात ‘पिवळी हरणं’ या नावाने ओळखल्या जाणा-या या फुलांचे छोटे छोटे ताटवे पाहिल्यावर पठारानं जणू पिवळा शालूच पांघरला आहे, असं भासत होतं. कोकणात गणशोत्सवात बाप्पाच्या डोक्यावर बाधलेल्या मंडपाला सोनकीची फुलं बांधली जातात. या पिवळया फुलांना बहर येतो श्रावणात. हा बहर गणेशोत्सवाच्या पंधरवडयापर्यंत टिकून असतो. ‘सोनीशिओ बोम्बेयेन्सीस’ किंवा ‘सोनीशिओ ग्रहमी’ हे या फुलांचं मूळ नाव. ब्रिटिश धर्मगुरू जॉन ग्रहमी यांनी अनेक फुलांवर संशोधन केलं. त्यांच्या स्मरणार्थ ‘सोनकी’ला हे नाव ठेवण्यात आलं आहे.
गणपतीचे मंडप सजवण्यासाठी सोनकीबरोबर तेरडाही लागतो. लाल-पिवळया रंगातील तेरडा कोकणातील बांधावर, शेतात, माळरानावर हमखास पाहायला मिळतो. मात्र आंबोलीची शोभा तेरडयानेही आणखीनच वाढवली आहे. त्यातही गुलाबी तेरडा अर्थात ‘पिंक बालसम’ आंबोलीत मोठया प्रमाणावर पाहायला मिळतो. ‘गेंद’ ही पांढ-या रंगाची फुलंही इथे पाहायला मिळाली. दुरून पाहताना ही फुलं हिरव्या गर्द पृष्ठभागावर सांडलेल्या शुभ्र सडयाप्रमाणे भासली. पाच ते १० सेंटिमीटरच्या देठावर चेंडूच्या आकारासारखा वा-यावर डोलणारा पांढ-या रंगाचा हा इवलासा गेंद ‘एरिओकोलोन’ या कुटुंबातील आहे. आंबोलीचं विस्तीर्ण पठार पायाखाली घालताना पावलापावलावर मनाला प्रफुल्लित करणारी अशी विविध फुलं नजरेत भरत होती. कित्येक तास उलटले तरी स्वत:ला हरवून बसलेल्या या वातावरणात थकवा मात्र बिलकुल जाणवला नाही. तेवढयात एका झुडुपावर फुललेली ‘कळलावी’ अर्थात ‘अग्निशिखा’ या फुलांनी लक्ष वेधून घेतलं. लाल, पिवळय़ा रंगाचं हे फूल मध्येच हिरव्या केशरी रंगात डोलताना पाहायला मिळालं. झुडुपावर पसरलेल्या वेलीवर हे फूल निसर्गाचा अद्भुत चमत्कारच म्हणायला हवा. ‘ग्लोरी लीली’ हे त्या फुलाचं शास्त्रीय नाव आहे. अशाच झुडुपांवरील वेलीवर इवलासा डोलणारा ‘कवला’ म्हणजेच ‘मिकी माउस’ हे ‘स्मिथीया’ कुळातील फूलही पाहायला मिळालं. ‘कवला’ची फुलं पश्चिम घाटात आंबोलीसह सर्वत्र पाहायला मिळतात. पिवळाधमक रंग ल्यालेल्या या फुलाच्या मध्यभागी असलेला थोडासा काळा रंग आणखीनच उठावदार दिसतो. ‘कवला’ची फुलं जिथे होती, त्याच्या आसपास ‘निळी मंजिरी’ची फुलंही उमलली होती. हिरव्या रंगाच्या पृष्ठभावर निळया रंगाच्या शाईचे ठिपके पडल्यावर कसं चित्रं दिसतं त्याप्रमाणे ती फुलं वाटली. ‘निळी मंजिरी’ची फुलं म्हणजे पाणथळ जागेत बोटभर उंचीच्या जांभळय़ा रंगातील तुळशीच्या मंजि-या अर्थात केसरासारखी वनस्पती. ‘पोगोस्टीमॉन डेक्कनेन्सीस’ हे त्याचं शास्त्रीय नाव. निळय़ा मांजरीच्या फुलाबरोबरीने ‘निलिमा’, सात वष्रातून एकदा फुलणारी ‘कारवी ’, ‘चित्रक’ अशी विविध फुलंही पाहायला मिळाली.
आंबोलीच्या जंगलात भ्रमंती करताना या वनस्पतींबाबत स्थानिक जाणकारांकडून माहिती समजली. आंबोलीत तब्बल १२० प्रकारच्या वनस्पती आढळतात. ‘अंजनी’, ‘जांभूळ’, ‘अश्वगंधा’, ‘सर्पगंधा’, ‘शतावरी’, ‘आवळा’, ‘हरडा’, ‘बेहडा’, ‘अर्जुन वृक्ष’, ‘कुडा’, ‘गरूडवेल’, ‘गोखरू’, ‘बेडकीहाल’, ‘रक्तचंदन’ अशा विविध वनस्पती पाहायला मिळाल्या. यात पाहायची होती ती ‘नरक्या’ नावाची वनस्पती. या वनस्पतीला ‘अमृतवृक्ष’ असंही म्हणतात. पश्चिम घाटात अत्यंत दुर्मीळ समजली जाणारी ‘नरक्या’ ही वनस्पती आंबोलीच्या पठारावर ब-याच प्रमाणात सापडते. ‘नरक्या’चा वापर कॅन्सरवरील औषधं बनवण्यासाठी होतो, तर वनस्पतीच्या इतर पंचांगांचा (मूळ, खोड, पान, फूल, फळ) वापर इतर औषधांमध्येही केला जातो. मध्यंतरीच्या काळात या वनस्पतीला तस्करीचं ग्रहण लागलं होतं. वनस्पतीची मोठया प्रमाणावर झालेली लुट पाहता आंबोलीतून नरक्या वनस्पती नाहीशी होतेय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, या परिसरातील सजग नागरिकांमुळे ‘नरक्या’चं अस्तित्व आजही टिकून आहे.
आंबोलीत जैवविविधतेच्या दृष्टीने ब्रिटिशकाळात आंबोली हिलस्टेशनला मोठं महत्त्व होतं. सावंतवाडी संस्थानची हंगामी राजधानी म्हणून आंबोलीची ओळख आहे. आंबोली पठाराच्या पायथ्याशी असलेला ब्रिटिशकालीन घाटमार्ग हा स्थापत्यशास्त्राचा एक नमुना म्हणून पाहायला मिळतो. धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत वनस्पती आणि फुलांचं एक अनोखं जग आहे. या जगात प्रवेश केल्यावर ते तसंच राहावं, अशी सर्वाचीच अपेक्षा आहे. किंबहुना ते तसंच राहिलं, तर आंबोलीची जगभर पसरलेली ओळख आणखीनच वृद्धिंगत होईल. तसंच अभ्यासकांना एक नवं दालन मिळेल, तर स्थानिकोंना नव्या वाटेवरच्या पर्यावरणाला आणखी समृद्ध करणारं पर्यटन जगाला दाखवता येईल. चालता चालता आंबोलीतील निसर्गाची ही नजाकत नजरेखालून घालताना के व्हा संध्याकाळ झाली हे समजलंच नाही. परतीच्या वाटेवरून चालताना असंख्य पक्ष्यांचे थवे आंबोलीच्या गर्द वनराईत शिरत होते. हळूहळू हा किलबिलाट शांत होत होता. फुलांच्या सप्तरंगात भिजलेला आंबोलीचा निसर्ग आता अंधाराच्या चादरीत गुंडाळला जात होता.