प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी
९५२७९१२७०६
माझ्या सर्व महिला भगिनींना
आदरपूर्वक नमस्कार
कालच महिला दिन पार पडला.या निमित्ताने काही हितगुज साधण्याचा मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. स्ञी ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे हे सर्वप्रथम कबुल करतांना कोणत्याही पुरुषाला कमीपणा वाटू नये अशी सर्व पुरुषांनाही विनंती करतो.कारण ज्या स्ञियांना निसर्गाने नवनिर्मितीची क्षमता निर्माण करणारी मोठी देणगी प्रदान केली आहे त्यांना श्रेष्ठ मानण्यात कोणताही पुरुषी अहंकार आडवा येऊ नये असे मला वाटते.प्राचीन काळापासून स्ञियांना कनिष्ठ लेखून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात येत होते.यासाठी धर्मग्रंथांचा आधार घेण्यात येत होता.परंतु म.फुले व सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातून व अनेक परिवर्तनवादी महामानवांच्या संघर्षातून स्ञियांकरीता मुक्तीची दारे उघडी झाली.हळूहळू स्ञिया सर्वच क्षेत्रात प्रगती करु लागल्या.आज तर एकाही क्षेत्रात स्ञी मागे नाही.उलट अनेक क्षेत्रात ती पुरुषांपेक्षा पुढे असून उच्चस्थानी विराजमान झाली आहे.त्यामुळे सर्वांना स्ञियांच्या या प्रगतीशील वाटचालीचा अभिमानच वाटायला हवा.राष्ट्रपती,प्रधानमंत्री,मु ख्यमंञी,कलेक्टर,कमिश्नर,वैमानि क,साहित्यीक यासारख्या सर्वच ठिकाणी तिने आपली बुध्दीमत्ता सिध्द केली आहे.त्यामुळे भारताच्या विकासात पुरुषांच्या बरोबरीने ती सुध्दा आता योगदान देत आहे.
एकीकडे हे सर्व घडत असतांना दुसऱ्या बाजूचे चिञ माञ फारच निराशाजनक व भयावह आहे.ज्या स्ञिया अत्यंत गरीबीत,दारिद्रयात जीवन जगत आहे त्यांच्याबद्दल आज मी बोलणार नाही.त्यांची बिचाऱ्यांची दोन वेळच्या जेवणाचीही बरोबर सोय नाही.त्यामुळे तो स्वतंत्र व गंभीर विषय आहे.परंतु आज आपल्याला शिक्षित व उच्चस्थानी पोहचलेल्या स्ञियांविषयी बोलायचे आहे.
ज्या सावित्रीबाईंच्या अपार संघर्षामुळे आजच्या स्ञिया शिक्षित झाल्या आहेत तिचे नाव घेण्यास सुध्दा आजच्या स्ञियांना कमीपणा वाटतो हे विदारक सत्य आहे.अनेक बुवा,बापू,अम्मा,दिदीचे फोटो अभिमानाने आपल्या घरात लावणाऱ्या उच्चविद्याविभूषीत स्ञियांच्या घरात सावित्रीबाईंना माञ जागा नाही हे पाहून मन विषन्न होते.मोठमोठया पदव्या असलेली स्ञी जेव्हा आसाराम,नित्यानंद,राम रहीम सारख्या ढोंगी लोकांच्या मोहपाशात स्वतःला विलीन करते तेव्हा प्रचंड वेदना होतात.संगणक,मोबाईल,लॕपटाॕप लिलया हाताळणारी स्ञी जेव्हा अमावस्या,पौर्णिमा,उपास तापास,नवस,कर्मकांड,मुहूर्त, नारायण नागबळी यासारख्या अवैज्ञानिक गोष्टी करण्यात धन्यता मानते तेव्हा माञ शिक्षणाचा सत्यानाश झालेला असतो.ग्रहण हे अशुभ असते,ही दिशा चांगली आणि ती वाईट,फक्त सात दिवसांचा आठवडा असलेल्या दिवसात हा वार पवित्र आणि तो अपविञ,अमावस्या वाईट व पौर्णिमा चांगली,काळा रंग अपशकुनी आणि पांढरा पवित्र यासारख्या अनेक मुर्ख समजुती जेव्हा शिकलेल्या स्ञिया बाळगतात तेव्हा साविञीबाईंनी यांना विनाकारण शिक्षित केले असे खेदाने म्हणावेसे वाटते.तिने आमच्यासाठी गोटे सहन केले.आम्ही माञ गोट्याला शेंदूर फासून जेव्हा त्याचा देव करतो तेव्हा शिक्षण घेवून आमची अवस्था गोट्यासारखी झाली आहे असे वाटते.
शिकलेल्या स्ञियांची आधुनिकता म्हणजे माॕडर्न कपडे घालने,गाडी चालविणे,महागडे मोबाईल हाताळणे,तुटकी फुटकी इंग्रजी बोलणे,सासू सासऱ्यांना घराबाहेर काढून वृध्दाश्रमात ठेवणे,हाॕटेलिंग करणे,आधुनिक सत्संगात तल्लीन होवून अडाणचोट ढोंगी बाबांसमोर नतमस्तक होणे,त्यांच्या चमत्काराचा प्रचार करणे म्हणजे आधुनिक व स्टँडर्ड विचार अशी व्याख्या आज झाली आहे.ज्या राज्यघटनेवर देश चालतो त्या भारतीय राज्यघटनेचे पहिले पानसुध्दा कधी न पाहिलेल्या व एकाही कलमाची माहिती नसलेल्या शिक्षित स्ञिया जेव्हा आमची अमुक पोथी मुखोद्गत आहे,आम्ही दिवसभर पारायणाला बसलो होतो,आमच्या दहा आरत्या पाठ आहे,आम्ही ९ दिवस पायात चप्पल घालत नाही,आम्ही दर्शनासाठी १०-१२ तास रांगेत उभे होतो असे मोठ्या गर्वाने सांगतात तेव्हा हसावे की रडावे समजत नाही.प्रा,डाॕ,अॕड,इंजि.अशा प्रतिष्ठित उपाध्या आपल्या नावासमोर लावणाऱ्या तथाकथित विद्वान स्ञिया जेव्हा हे सर्व थोतांड करतात तेव्हा साविञीच्या कष्टाची आणि त्यागाची आम्ही माती व पालापाचोळा करत असतो हे लक्षात घेतले पाहिजे.
संत तुकोबा,संत तुकडोजी,संत गाडगेबाबा यासारख्या अनेक संतांनी आम्हाला या अंधश्रध्देच्या खाईतून वर काढण्याचा आयुष्यभर कसोशीने प्रयत्न केला.परंतु आम्हाला त्यांच्यापेक्षा आजचे बलात्कारी संत जवळचे वाटतात.त्यांच्या पायावर लोटांगण घेण्यात आमच्या स्ञियांना अभिमान वाटतो.फसविल्या गेल्यावर माञ काहीच पर्याय नसतो.निर्मल बाबा सारखा नाटकी माणूस शिकलेल्या लोकांना उध्दाराची किल्ली सांगून कोट्यावधी रुपये लूटून नेतो तरी आम्ही काहीच बोलत नाही.शिक्षणाने माणूस हिंमतबाज बनतो की भेकाड हेच समजत नाही.विज्ञानाने निर्माण केलेली सृष्टी आणि त्याचे सर्व फायदे आम्ही घेतो.पण वैज्ञानिक दृष्टिकोन माञ आम्ही का स्विकारत नाही हे मनाला अचंभित करणारे कोडे आहे.जिजाऊ,साविञी,अहिल्याबाई, रमाई,ताराबाई शिंदे,फातिमा शेख,तानुबाई बिर्जे,मुक्ता साळवे,सुनिता विल्यम्स,कल्पना चावला सारख्या अनेक महान स्ञियांच्या चरिञाचे वाचन जर शिकलेल्या महिलांनी केले तर कोणताच बुवा,बापू,अम्मा,दिदी आमच्या स्ञियांना फसवू शकणार नाही एवढेच महिला दिनाच्या निमित्याने सांगावेसे वाटते.जो समाज आपल्या स्वतःच्या लग्नाची तारीख ठरवू शकत नाही,आपल्या रक्तामासाच्या मुलामुलींचे नाव स्वतः ठेवू शकत नाही,आपल्या नवीन घरात स्वतःच्या मनाने प्रवेश करु शकत नाही तो समाज कितीही शिकला तरी तो मानसिकदृष्ट्या गुलाम असतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे. किंबहुना हे ध्यानात ठेवून पुढचा मार्ग चालायला शिका.
धन्यवाद !