विवेक ताम्हणकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, आचरा मार्गावर असलेल्या “रामगड” वर यावर्षी इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला, दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई आणि रामगड वासियांनी या गडावर स्वच्छता मोहीम राबवत गड झाड वेलींपासून मोकळा केला, दुर्गवीर प्रतिष्ठानचे संतोष हसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रांमगडं येथील निवृत्त लष्कर अधिकारी श्री देसाई यांच्या सहकार्याने हि मोहीम पार पडली विशेष म्हणजे गडावर पणत्या व मशाली पेटविण्यात आल्या. फुलांची सजावट व वास्तूंचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण पुन्हा नव्याने जागी करण्यात आली.
कणकवलीपासून काही अंतरावर असलेल्या रामगड किल्ल्याला ऐतिहासिक वारसा आहे. समुद्रसपाटीपासून अवघा ५० मीटर उंचीचा हा किल्ला आहे. गोमुखी पद्धतीने बांधलेला किल्ल्याचा प्रवेशमार्ग म्हणजे शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ आहे.उत्तम अवस्थेमधील प्रवेशद्वारातून आत आल्यावर पहारेकर्यांच्या देवडय़ा आपल्या दिसतात.रामगडाची तटबंदी काही ठिकाणी १५ ते २० फूट उंचीची आहे. काही ठिकाणी तिची पडझड झालेली दिसते. या तटबंदीमधे जवळजवळ पंधरा बुरुजांची गुंफण केलेली आहे. या बुरुजांमुळे गडाची सरंक्षणसिद्धता वाढवलेली दिसून येते. पुर्वी या बुरुजांवर तोफा होत्या. सध्या सात तोफा किल्ल्यात आहेत. रामगडाच्या एका बाजुने गडनदी वहाते. नदीच्या बाजुच्या तटबंदीमधे एक लहान दरवाजा केलेला आहे.रामगडाचा आवाका लहानच आहे. गडावरील घरांची जोती. वाडय़ाचे अवशेष, तटबंदी, बुरुज तसेच गणेश्मुर्ती तोफां अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी पहायला मिळतात. शिवकालीन बांधकामाची वैशिष्ठ जपणारा रामगड मात्र इतिहासाबद्दल मौन बाळगून आहे. रामगडाचा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकुन घेतल्याची नोंद आहे. इंग्रजांच्या सेनेचा कॅप्टन पिअससन हा रामगड जिंकण्यासाठी आला. त्याने ६ एप्रिल १८१८ मध्ये रामगड जिंकून घेतला. याच इतिहासाला अलीकडेच पुन्हा एकदा उजाळा देत दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई आणि रामगड वासियांनी या किल्ल्याची तटबंदी साफ केली आहे, आगामी काळात इथे इतिहास प्रेमी आणि पर्यटकांची ये जा वाढावी या करता अशाप्रकारच्या मोहिमांचे आयोजन केले जाईल अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.