पुणे – ज्या घरांमध्ये आजही विजेच्या दिव्यांचा प्रकाश नाही, अशा आदिवासी वस्त्यांवरील घरात आनंदाचे दीप प्रज्वलीत करीत पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अनोखी दिवाळी साजरी केली. पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मुळशी तालुक्यातील वस्त्यांवर राहणारे कातकरी समाजातील बांधव दिवाळीनिमित्त आयोजित आनंदोत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते. तर, चिमुकल्यांनी कधीही न पाहिलेले फटाके उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला.
समाजातील वंचित घटकांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा याकरीता पुण्यातील गुरूवार पेठेतील वीर शिवराज मंडळ, कसबा पेठेतील त्रिमूर्ती मंडळ व बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट या मंडळांनी मुळशी तालुक्यातील आदीवासी पाड्यांवर जाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी किरण सोनीवाल, पीयूष शहा, विनय चाळनिवाले, सागर घम, विकास महामुनी, विजय रोकडे, ओंकार रोकडे, शेखर नागपुरे, संकेत निंबाळकर, साहिल केळकर, नंदकुमार ओव्हाळ, चैतन्य सिनरकर, मोहित झांजले, ऋत्विक गरुड, सचिन आखरे आदी उपस्थित होते. यावेळी पाड्यावरील आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ, फटाके आणि दिवाळीतील इतर साहितियाचे वाटप करण्यात आले.
किरण सोनीवाल म्हणाले, डोंगरावरील या वस्तीमध्ये प्रत्येक घरात जावून कार्यकर्ते दिवाळी फराळ, उटणे, पुस्तके, पणत्या आणि कपडे देऊन कुटुंबांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. तसेच प्रत्येक घराच्या दरवाजामध्ये आकाशकंदील लावत त्यांना दिवाळीचे महत्त्व सांगतात. यावर्षी मुळशी तालुक्यातील कळमशेत, दिसली, बेलवाडे गावातील तब्बल नव्वदहून अधिक घरांमध्ये दिवाळीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.