पुणे – दारुपासून मुक्ती हीच राष्ट्रभक्ती…व्यसनाचा करु धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार… असे म्हणत खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रस्त्यावर उतरुन व्यसनमुक्तीचा संदेश दिला. गांधीजींसोबतच पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर अॅड. सिद्धार्थ धेंडे यांसह लोकप्रतिनिधींनी हातामध्ये फलक घेत रस्त्यावर उतरुन जनजागृती केली. दारुबंदी करुन पुण्याला व्यसनमुक्त शहर बनविण्याकरीता दारु हद्दपार करण्याचा संकल्प यावेळी लोकप्रतिनिधींसह पुणेकरांनी स्वाक्षरी मोहिमेने केला.
आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्राच्या वतीने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला गुडलक चौक, डेक्कन येथे या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, निलीमा खाडे, अॅड. असिम सरोदे, केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, राजन चांदेकर, अॅड. बाळासाहेब बानखेडे, उदय जगताप, भोला वांजळे, महेश वाडेकर, प्रकाश धिडे, मल्लेश जमादार, हर्षल पंडित, संतोष राऊत, विवेक कदम, अनिरुद्ध हळंदे, प्रविण वैद्य, रवि लोहिया, अमित थोरात, प्रमोद शेळके, प्रदीप खर्से, दत्तात्रय सोनार आदी उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधींच्या वेशातील कलाकाराने तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवे. दारुसोबतच ई-व्यसन हे तरुणांना मृत्युकडे नेणारे ठरत आहे, यासारखी दुसरी शोकांतिका नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या व्यसनाधिनतेतून पुणे शहर व्यसनमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करुया.
अॅड. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, सुमारे ९० टक्के लोक व्यसनांमुळे आजारी पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो. पुण्यातील ही विदारक स्थिती थांबविणे काळाची गरज आहे. पुणे शहर आपण स्मार्ट करीत आहोत, त्यासोबतच व्यसनमुक्त स्मार्ट नागरिक देखील तयार व्हायला हवे. दारुबंदीचा निर्णय लोकप्रतिनिधींनी एकमताने मंजूर करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ.अजय दुधाणे म्हणाले, महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये तरुणाईसह महिलांना व्यसनाधिनतेपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम केले जातील. स्वाक्षरी फलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखविण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. व्यसनविरोधी संकल्प करीत दारुला हद्दपार करण्याकरीता पाठिंबा देण्याकरीता स्वाक्षरी मोहिम देखील राबविण्यात आली. यामध्ये पुणेकरांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.