पुणे – दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 च्या लायन्स फोरम फॉर इनोव्हेशन्स आणि ऑटोमोटिव्ह कंपोनंट मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) यांच्यातर्फे ‘लायन्स इनोव्हेशन एक्स्पो 2017’चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 8 व 9 डिसेंबर 2017 या दोन दिवशी सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मेरियट येथे हे प्रदर्शन भरणार आहे. इनोव्हेटर्स आणि गुंतवणूकदार यांना एकाच व्यासपीठावर आणून समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजिले आहे.
विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कृषी, अन्न व प्रक्रिया, वैद्यकीय यासह विविध क्षेत्रातील इनोव्हेशन्स या प्रदर्शनात यावेत. तसेच इनोव्हेटर्सना आपले इनोव्हेशन सादर करुन योग्य गुंतवणूकदार जोडून द्यावा, हा यामागचा उद्देश आहे. या प्रदर्शनामुळे इनोव्हेटर्सना आपले इनोव्हेशन लोकांपर्यंत पोहोचवता येईल. संबंधित क्षेत्रातील गुंतवणूकदारांशी चर्चा करता येईल. स्टार्टअपसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. याशिवाय, उत्कृष्ट तीन इनोव्हेशन्सना एसीएमएच्या समिटमध्ये 1000 पेक्षा जास्त कंपन्यांच्या अधिकार्यांसमोर आपले इनोव्हेशन सादर करण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थी आणि नागरिकांत नवनिर्मितीबद्दल जागरुकता निर्माण व्हावी, इनोव्हेशन्सला चालना मिळावी, या उद्देशाने लायन्स फोरम फॉर इनोव्हेशन्सची स्थापना जानेवारी 2017 मध्ये करण्यात आली. फोरमच्या कार्यक्रमांसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.
या फोरमअंतर्गत जानेवारी 2017 आणि जून 2017 मध्ये ‘इनोव्हिजन’ या सेमिनार व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर, संदीप वासलेकर, डॉ. अमिताव मलिक, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. के. एन. गणेश, प्रिया बांडे यांनी मार्गदर्शन केले. एमसीसीआयए, क्रेडाई, मिटकॉन, व्हीआयटी, भारती विद्यापीठ, भारतीय युवाशक्ती ट्रस्ट, देआसरा, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग असोसिएशन, जितो यासह इतर संस्था या फोरमशी सलग्नित आहेत.
अधिक माहितीसाठी हेमंत नाईक : 9823142567 या क्रमांकावर किंवा www.lionsinnforum.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. तसेच इनोव्हेटर्सना सहभागासाठी राजेंद्र गोयल : 9422011966 व गुंतवणूकदारांना सहभागासाठी तुषार मेहता : 9850958822 यांच्याशी संपर्क करावा, अशी माहिती लायन्स फोरम फॉर इनोव्हेशन्सचे चेअरपर्सन आणि उपप्रांतपाल रमेश शहा, एसीएमएच्या सपना बारवकर, एक्स्पोचे समन्वयक हेमंत नाईक, सहसमन्वयक राजेंद्र गोयल, सचिव अशोक मिस्त्री, जनसंपर्क अधिकारी शाम खंडेलवाल, आनंद आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.