पुणे – इलेक्ट्रोहोमिओपॅथीद्वारे रुग्णांना उपचार देणा-या डॉक्टरांवर शासनाकडून चुकीच्या कारवाया झाल्याच्या घटना सर्वत्र सुरु आहेत. प्रत्यक्षात सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार इलेक्ट्रोहोमिओपॅथी सर्टीफिकेट प्राप्त डॉक्टरांना या पॅथीद्वारे वैद्यकीय व्यावसायिक (मेडिकल प्रॅक्टिशनर) म्हणून मान्यता आहे. परंतु तरीही सुप्रिम कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून अनेक डॉक्टरांवर चुकीच्या कारवाया होत आहेत. या चुकीच्या कारवाया त्वरीत बंद करुन इलेक्ट्रोहोमिओपॅथी डॉक्टरांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी मागणी करीत महाराष्ट्र इलेक्ट्रोहोमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (मेपा) च्यावतीने केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कमलपुष्प प्रतिष्ठानचे आनंद रेखी, मेपा संघटनेचे डॉ.धर्मेंद शहा, डॉ.शंकर शिंदे, डॉ.मोहन रायकर, डॉ.भाग्यश्री मंडलिक, डॉ.सुनील आंगणे, डॉ.रत्नप्रभा सस्ते, डॉ.पांडुरंग कांबळे, डॉ.बाप्पू दगडे यांसह इतर वैद्यकीय व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते. मेपा संघटनेच्यावतीने केंद्रीय मंत्र्यांसह पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट, पुणे मनपा सहआयुक्त शितल तेली-उगले यांना देखील हे निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत लवकरात लवकर देशभरातील डॉक्टरांची यादी द्यावी, तसेच याविषयासंदर्भात योग्य निर्णय घेऊन कार्यवाही करु, असे आश्वासन श्रीपाद नाईक यांनी यावेळी दिले. डॉ.धर्मेंद्र शहा म्हणाले, दिल्ली, मुंबई, जबलपूर, कलकत्ता, पंजाब, केरळ, लखनऊ, अलाहबाद, उत्तराखंड, अहमदाबाद येथील उच्च न्यायालयांनी इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या बाजूने सकारात्मक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. याशिवाय देशाच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये या पॅथीचा समावेश करण्याबाबत प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी प्रशासनाची सचिव पातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, तरीही अनेक ठिकाणी या पॅथीच्या व्यावसायिकांना शासकीय अडचणी व चुकीच्या कारवायांना सामोरे जावे लागत आहे. नुकतेच केंद्र सरकारकडून पत्र आले असून, मान्यता प्रपोजल देण्याबाबत सांगितले आहे. तसेच महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील डॉक्टरांची विस्तृत यादी देण्यास सांगण्यात आले आहे. त्यापूर्वीच मेपा संघटनेने महाराष्ट्राची यादी दिली असून त्यावर विचार करुन त्वरीत मान्यता मिळावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत.