पुणे :- उमाजी नाईक यांच्या जयंती शासकीय नियमानुसार यापुढे प्रत्येकवर्षी ७ सप्टेंबरला साजरी होणार आहे असा अद्यादेश आज शासनाकडून काढण्यात आला आहे. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
अधिवेशन काळात संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्या सह जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी रामोशी समाजाच्या शिष्ठमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भातील चर्चा घडवून आणली होती. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी उमाजी नाईक यांची जयंती सरकारच्या वतीने साजरी करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आज महाराष्ट्र शासनाने अद्यादेश काढून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय,निम-शासकीय कार्यालयात ७ सप्टेंबर रोजी उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.
इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे आद्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरी केली जाते. सरकारच्या वतीने ही त्यांची जयंती साजरी व्हावी अशी रामोशी समाजाची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती. शासनाच्या अध्यादेशाने त्यांची ही मागणी पूर्ण होत असल्याने त्यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीच उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठीही मुख्यमंत्र्यांनी १ कोटी रुपये तर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून १ कोटी रुपयांचा निधी देण्याचे श्री बापट यांनी मान्य केले आहे . पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने स्मारकाचे काम ही लवकरच सुरु होईल असा विश्वास रामोशी समाजाकडून व्यक्त होत आहे.