पुणे – “गेल्या आर्थिक वर्षात (2016–17) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) मार्केट शेअर अर्थात बाजारातील हिश्श्यात विमा पॉलिसीच्या निकषावर लक्षणीय वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात एलआयसीने दोन कोटी एक लाखापेक्षा अधिक पॉलिसी पूर्ण केल्या असून, जवळपास सव्वा लाख कोटी रुपये प्रथम हप्ता उत्पन्न प्राप्त केले आहे,” अशी माहिती पुणे विभाग (1)चे वरिष्ठ मंडळ अधिकारी प्रसांत नायक यांनी दिली. दरम्यान, 62व्या वर्धापनदिनानिमित 1 ते 7 सप्टेंबर 2017 या कालावधीत एलआयसी सप्ताहाचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
एलआयसीच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत एलआयसीच्या कामगिरीचा आढावा घेताना प्रशांत नायक बोलत होते. यावेळी विपणन अधिकारी अब्राहम वर्गिस आणि डी. एम. सुखात्मे यांच्यासह एलआयसीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशांत नायक म्हणाले, “पॉलिसी संख्येवर आधारित एलआयसीचा बाजारातील हिस्सा 76.09 टक्के, तर प्रथम हप्ता उत्पन्नावरील हिस्सा 71.07 टक्के आहे. सद्यस्थितीतील पॉलिसींची संख्या 29.04 कोटी इतकी आहे. 31 मार्च2017 अखेर एलआयसीचे एकूण उत्पन्न 4,92,626.60 कोटी असून, एकूण मालमत्ता 25,72,028 कोटी इतकी आहे. तर एलआयसीची गंगाजळी 23,23,502.59 कोटी आहे. एलआयसीने 215.58 लाख दाव्यांचे निराकरण केले असून, दाव्यांपोटी 1,12,700.41 कोटी रुपयांचे वितरण केले आहे. त्यामध्ये मुदतपूर्व दाव्यांचे प्रमाण 98.34 टक्के, तर मृत्यू दाव्यांचे प्रमाण 99.63 टक्के आहे.”
10 वर्षानंतर प्रथम हप्ता उत्पन्नाचे उद्दिष्ट
पुणे विभाग 1 तर्फे जवळपास 10 वर्षानंतर प्रथम हप्ता उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासह इतर सहा निकषांवरही उद्दिष्ट्यपूर्ती झाली आहे. 2016–17 या वर्षात 1,75,548 पॉलिसीमार्फत 38,808.53 लाख रुपयांचे एकूण हप्ता उत्पन्न झाले आहे. यामध्ये चिंचवड शाखेने (21,273), निगडी (18,969), पिंपरी (13,912) पॉलिसी केल्या आहेत. चिंचवड, निगडी, पिंपरी, येरवडा व कॅम्प या शाखांनी विमा हप्ता उत्पन्नामध्येही विशेष कामगिरी केली आहे. प्रमोद पाटणकर, श्रवण तलरेजा, गणपत चव्हाण, ज्ञानेश्वर डोके, गणेश भूजबळ, रमेश बीजापूर, अनिल पिंटो व संजय गोर्हे या विकास अधिकार्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. विमा प्रतिनिधींमध्ये कविता चनोदिया, वनिता ढमाले, शिरीष गोवर्धन, महेश गुगळे, रामचंद्र नायर, स्वाती धूत, गणेश देशमुख, सुभाष पागळे, सुनिलकुमार आग्रे, चित्रा बेंद्रे, एस. एम. जाधव, किरण भोलाणे, राजेंद्र वाघ व शशिकांत पांडे यांनी चांगले काम केले आहे. क्लेम सेटलमेंटमध्येही पुणे विभाग 1 ने मोलाची कामगिरी बजावली आहे. देय विद्यमानता व मृत्यू दाव्यांचे निराकरण करताना 5242 मृत्यू दाव्यांपोटी 86.58 कोटी रुपये वारसांना दिले, तर मुदतपूर्ती दाव्यांपोटी767.97 कोटी रुपये देण्यात आले, असे नायक यांनी सांगितले.