जे . डी . पराडकर , संगमेश्वर
एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी ! तर कधी हिरव्यागार शेतीच्या लांबच लांब रागा. नदी – नाले पार करताना दिसणारं निळशार पाणी , तर कधी खाडी किनाऱ्याचं दिसणारं मनोहारी दृष्य. हे सारं एकाच प्रवासात पाहायचं असेल तर आपल्याला कोकण रेल्वेतूनच प्रवास करायला हवा. कोकणची शान म्हणून ओळखली जाणारी कोकण रेल्वे जेंव्हा कोकणातून धावू लागली त्यावेळी खऱ्या अर्थानं कोकणवासीयांची स्वप्न साकार झाली . कोकणचं अर्थकारण बदलण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कोकण रेल्वेचा कोकणच्या पर्यटन विकासात खुप मोठा वाटा आहे . कोकण रेल्वे म्हणजे तंत्रज्ञानाचा आणि अभियंत्यांच्या अथक परिश्रमाचा जबरदस्त आविष्कार म्हटलं जातं . विविध वैशिष्ट्यांनी नटलेल्या कोकण रेल्वेचं नांव जागतिक स्तरावर अभिमानानं घेतलं जातं . कोकणच्या तिनही जिल्ह्यात कोकण रेल्वेची असणारी वैशिष्ट्ये वेगवेगळी असून खरं तर हा मार्ग या तीन जिल्ह्यातील वैशीष्ट्यांसाठी खास करून जगभर ओळखला जातो . कोकण रेल्वे मार्ग टप्प्याटप्याने पुर्णत्वास गेल्यानंतर परदेशातून येणाऱ्या पर्यटकांनी कोकण रेल्वेच्या प्रवासाला प्रथम पसंती दिली . या मार्गामुळे मुंबई गोवा महामार्गावरील भार कमालीचा कमी होवू शकला . रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि स्वस्त असल्याने अन्य असंख्य प्रवाशांनीही कोकण रेल्वेला प्राधान्य दिले . कोकण रेल्वे मार्गामुळे मुंबई गोवा महामार्गावरुन धावणारी वाहनं कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होवून प्रदुषणाला आळा बसवण्यात मोठे यश आले आहे. मुंबईच्या गर्दीतून कोकण रेल्वे बाहेर येवू लागली की निसर्गाचं होणारं दर्शन पुढे केरळ पर्यंत अविरत होत राहते. कोकण रेल्वेचे रुळ सलग जोडलेले असल्यामुळे मुंबईत लोकलमध्ये बसल्यावर जसा आवाज येतो तसा तो या मार्गावर येत नाही. रायगडमध्ये प्रवेश केल्यानंतर पावसाळी आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात पाहायला मिळणारी भातशेती मन मोहवून टाकते. कोकण रेल्वे म्हणजे वळणं , पूल , भराव आणि बोगदे ! यातून वाट काढत जाणारी कोकणराणी म्हणजे एक अद्भूत आश्चर्यच. रायगड मधील एक वळण तर एवढे आश्चर्यकारक आहे , की एका ठीकाणी पहिल्या डब्यातून शेवटचा डबा पाहायला मिळतो. अर्धवर्तुळाकार असणारे हे वळण असंख्य प्रवाशांचे फोटो काढण्याचे आवडते ठिकाण बनले आहे . रायगड जिल्ह्याच्या हद्दीतून रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करीत असताना महामार्गावरील कशेडी घाटाचा भाग रेल्वेने ठराविक उताराच्या आणि तीन किमी पेक्षा अधिक लांबीच्या बोगद्याद्वारे पार केला आहे . काही मिनीटातच जिल्ह्यांच्या हद्दी बदलण्याचं काम या बोगद्यानं केलं आहे . रत्नागिरी जिल्हा म्हणजे सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा , खोल दऱ्या , अथांग समुद्र आणि हिरवीगार वनराई ! कोकण रेल्वेचा मार्ग समुद्राच्या काही अंतरावरुन असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दी पर्यंत रेल्वेतून समुद्राचे दर्शन होत नाही . कट आणि कव्हर पध्दतीचे बोगदे प्रथमतः कोकण रेल्वे मार्गावरच पाहायला मिळतात . रत्नागिरीच्या अलिकडे असणारा करबुडे हा साडेसहा किमी लांबीचा बोगदा आशीया खंडातील मोठा बोगदा म्हणून ओळखला जातो . एवढ्या मोठ्या बोगद्यात वायुविजनासाठी केलेली सोय म्हणजे कुशल तंत्रज्ञानाची अलौकीक कामगिरी आहे . केवळ आशीया खंडातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक करबुडे बोगदा पाहण्यासाठी कोकण रेल्वेतून प्रवास करतात. रत्नागिरी स्टेशन पार केल्यानंतर काही अंतरावर असणारा पानवळ येथील पूल आशीया खंडातील उंच पूल म्हणून ओळखला जातो. पानवळच्या पूलावरुन कोकण रेल्वे थेट बोगद्यात झेपावते . या पूलावर रेल्वे आल्यानंतर खाली नजर गेली , की पूलाची भव्यता लक्षात येते . कोकणच्या दमदार पावसाला सांभाळत उंच पूल आणि बोगद्यांची अशी आव्हानात्मक कामं करणे हे कोकण रेल्वे तंत्रज्ञाना पुढील मोठे आव्हान होते मात्र एकीच्या आणि जिद्दीच्या बळावर ते लिलया पेलण्यात आले . सिंधुदूर्ग जिल्हा असो गोवा राज्य असो वा पुढे याच मार्गावर नजरेचं पारण फेडण्यासाठी असणारा दुधसागर धबधबा म्हणजे जगभरातील पर्यटकांचे खास आकर्षण समजला जातो. सुरुवातीला केवळ दोन गाड्यांनी सुरु झालेल्या या मार्गावर आज दिवसाला २४ पेक्षा अधिक प्रवासी गाड्या धावत आहेत . याबरोबरच मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांनी तर कोकणला समृध्द करण्यात मोठा हातभार लावला आहे . या मार्गावरील पॅलेस ऑन व्हील ही गाडी म्हणजे जणू राजवाड्याची अनुभूती देणारा महाल आहे. खास परदेशी पर्यटकांसाठी असणारी ही विशेष गाडी कोकणच्या खाद्य संस्कृतीबरोबरच कला संकृतीचं देखील दर्शन घडवते . मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर धावणारे मालवाहू ट्रक आपल्या शिरावर घेऊन धावण्याची किमया कोकण रेल्वेनं करुन दाखवली असून या रो – रो सेवेमुळे महामार्गावरील ट्रॅफीक कमी होण्यास मोठी मदत झालीच शिवाय असंख्य मालवाहू ट्रकचे इंधन वाचून प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होत आहे. विद्युतीकरणा बरोबरच दुपदरीकरणाचा ध्यास लागलेली कोकण रेल्वे येत्या काही वर्षात केवळ देशातीलच नव्हे तर जगातील एक प्रमुख रेल्वे म्हणून ओळख प्राप्त करणार आहे. केवळ विविध वैशिष्ट्यांनी नटलेली म्हणून नव्हे तर कोकणसह कोकणच्या आर्थिक विकासाचं गणीत बदलण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारी ही रेल्वे म्हणूनच कोकणराणी म्हणून ओळखली जातेय.