कणकवली नगरपंचायत निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अभूतपूर्व यश मिळविले आहे. पक्षाचे समीर नलावडे हे नगराध्यक्ष झाले आहेत. तर एकूण ११ नगरसेवक निवडून आले आहेत. नलावडे यांचा ३७ मतांनी विजय झाला असून त्यांनी भाजपचे तगडे उमेदवार कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांना धोबीपछाड दिला. आमदार नितेश राणे यांची मोर्चे बांधणी आणि मेहनत या निवडणुकीत स्वाभिमानाच्या यशातील ठळक बाब आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना झाल्यानंतर कणकवली नगरपंचायत हि या पक्षासाठी पहिलीच निवडणूक होती. मात्र या निवडणुकीतील यशाने स्वाभिमानाला शुभ शकुन दिला आहे. स्वाभिमान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांनी युती करत तर शिवसेना आणि भाजप या दोघांनी युती करत हि निवडणूक लढवली. स्वाभिमान १०, राष्ट्रवादी १, शिवसेना ३, भाजपा ३ अशी नगरपंचायत मधील पक्षीय बलाबल आहे.
विजयी उमेदवार – प्रभाग १- कविता किशोर राणे (स्वाभिमान), प्रभाग २- प्रतीक्षा सावंत (स्वाभिमान), प्रभाग३- अभिजित मुसळे (स्वाभिमान), प्रभाग ४- अबीद नाईक (राष्ट्रवादी), प्रभाग ५- मेघा गंगाण (स्वाभिमान), प्रभाग ६- सुमेधा अंधारी (भाजपा), प्रभाग ७- सुप्रिया नलावडे (स्वाभिमान), प्रभाग ८- उर्मी जाधव (स्वाभिमान), प्रभाग ९ – मेघा सावंत (भाजपा), प्रभाग १०- माही परुळेकर (शिवसेना), प्रभाग ११- विराज भोसले (स्वाभिमान), प्रभाग १२- गणेश उर्फ बंडू हर्णे (स्वाभिमान), प्रभाग १३ – सुशांत नाईक ( शिवसेना ), प्रभाग १४ – रुपेश नार्वेकर (भाजप), प्रभाग १५ – मानसी मुंज ( शिवसेना ), प्रभाग १६ – संजय कामतेकर (स्वाभिमान) प्रभाग १७ – रवींद्र गायकवाड (स्वाभिमान)
भाजपचे संदेश पारकर हे आगामी विधानसभा निवडणूक लढवायला इच्छुक होते. त्यांना ऐनवेळी कणकवलीच्या रिंगणात उतरवून भाजपाने खेळी खेळण्याचा प्रयत्न केला खरा मात्र हा प्रयत्न भाजपा पेक्षा संदेश पारकर यांच्या अंगाशी आला आहे कारण त्यांना विधानसभेच्या उमेदवारीवर सक्षमपणे दावा करणे आता शक्य होणारे नाही.