विवेक ताम्हणकर
शिक्षण, नोकरी यांमध्ये पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे येणाऱ्या महिला सामाजिक कार्यातही तसूभर मागे नाहीत. कोकणातल्या सिंधुदुर्गात अपंगांना स्वतच्या पायावर उभं करण्यासाठी झटणाऱ्या नसीमाताई हुरजूक अशांपैकीच. त्यांची कहाणी म्हणजे नवी देणारीच.
इच्छेला महत्त्वाकांक्षेचे पंख असतील तर कोणतीही गोष्ट साध्य असते. पंखांशिवायही माणूस गगनभरारी घेऊ शकतो याचं जिवंत उदाहरण सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यात मोरे गावातील स्वप्ननगरीत पाहायला मिळते. या स्वप्ननगरीत राहतात अपंग! पण इथे अगदी पूर्णत: अपंग असलेलेही शेती करतात, शिकतात, विविध वस्तू बनवतात, अपंगांसाठीची साधनेही बनवतत. सुदृढ माणूस करतो त्याप्रमाणे सर्वच काम हे अपंग करतात.
काय आहे या अपंगांच्या स्वप्ननगरीची कहाणी..
कोल्हापूर येथील नसीमा हुरजूक यांची कहाणी जेवढी सुन्न करणारी तेवढीच माणसातली चेतना जागवणारीही. वयाच्या सोळाव्या वर्षी पाठीच्या कण्यात खेळताना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले. अशा वेळी होणाऱ्या वेदना त्यांना सहन होत नव्हत्या. शरीर तर अपंगच, मनही खचलं होतं. इच्छा मरणाची तळमळ वाढली असताना अचानक बाबुकाका दिवाण या पूर्णत: अपंग असलेल्या परंतु अपंगांसाठी काम करणाऱ्या समाजसेवकाची भेट झाली आणि नसीमाताईंना इथेच जगण्याची नवी उमेद मिळाली. अपंगांच्या स्पर्धा, शिक्षण, परदेशातील स्पर्धात सहभाग घेतल्यावर भारतातील अपंग पुनर्वसन कार्याची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. यातूनच सन १९८४ साली हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर ही संस्था उभी राहिली. अपंगांचं पुनर्वसन करणे म्हणजे त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. या शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड असल्यास खऱ्या अर्थाने अपंग स्वयंपूर्ण होऊ शकतात हे लक्षात घेऊन नसीमाताईंनी कोल्हापूर येथे उसगावमध्ये शाळा सुरू केली. पुढे पुण्यातील मावळ तालुक्यात काणे फाटा येथे मतिमंद व अपंगासाठी शाळा सुरू केली. यानंतर सिंधुदुर्गमधील मानगाव खोरे (ता. कुडाळ) येथील गाव मोरेमध्ये तिसरी शाळा सुरू झाली. या तीनही शाळांमधून जवळपास ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात, तर २५० विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात राहतात.
या शाळांमधून अपंगांना पुस्तकी शिक्षण तर मिळतेच शिवाय शेती, बागायती, गृहउद्योग, बांधकाम, अपंगांच्या विविध वस्तू बनवणे, कारपेंटरी, शिवणकाम, फळ प्रक्रिया उद्योग यांचं प्रशिक्षण मिळतं. प्रत्येक वसतिगृहात भाताची व पिठाची गिरण आहे. विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करून खर्च चालवला जातो.
कोल्हापूर उसगाव येथील घरोंदा वसतिगृह व समर्थ विद्यामंदिर ही शाळा आहे. या शाळेला ८ वीच्या वर्गाला परवानगी मिळविण्यासाठी सध्या नसीमाताईंची धडपड सुरू आहे. अनेक वेळा उपोषणाचा मार्गही अवलंबला. मात्र आता शेवटी परवानगी मिळेपर्यंत उपोषण करणार, असे नसीमाताईंनी सांगितले. ‘अपंगांना काय त्रास सहन करावा लागतो ते आम्हालाच कळतं. अपंगांसाठी महाराष्ट्रात एक साधा आश्रम नाही त्यासाठी मध्यप्रदेशात जावे लागते,’ याबाबत ताई खेद व्यक्त करतात.
नसीमाताईंनी आतापर्यंत सुमारे १५ हजार लोकांना नवीन पंख दिलेत. या संस्थेमधून बाहेर पडलेल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. कोल्हापूर येथे ही संस्था अपंगांसाठी गॅस एजन्सी, पतसंस्था चालवते.
साधा पाय मुरगळला तर आपल्याला चालणे मुश्कील होते. मात्र हात नसतानाही पायाने लिहिणारा, काखेत बॅट पकडून क्रिकेट खेळताना विद्यार्थी येथे पाहायला मिळतो. नसीमाताई हुरजूक यांनी आपले कार्य ग्रामीण भागात चालवले असून त्या आपल्या संस्थेत मॅरेज ब्युरोही चालवतात. अपंगांची अपंगांबरोबर किंवा सुदृढ मुलांबरोबर येथे विवाह जमवले जातात. खऱ्या अर्थाने अपंगांच्या स्वप्नांना नवे पंख देऊन गगनभरारी घ्यायला लावणारे नसीमाताईंचे काम कोणालाही लाजवणारे आहे