पुणे : राजसदरेपासून बाजारपेठेपर्यंत अथांग अशा रायगडावरील ऐतिहासिक इमारतींच्या प्रतिकृती पाहण्यासोबतच मायभूमीचा दागिना असलेल्या या गडाचा इतिहास पुणेकरांनी रायगड पूर्वी होता तसा… या लाईट अॅण्ड शोमधून याची देही याची डोळा अनुभविला. भग्न झालेल्या रायगडाच्या अवशेषांकडे पाहून पर्यटकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना रायगडाच्या या प्रतिकृतीतून आज उत्तरे मिळाली. शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा, मिरवणूक आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवाव्या अशा घटनांना दुर्गदुगेश्वर रायगडाच्या साक्षीने उजाळा मिळाला.
निमित्त होते, इतिहास प्रेमी मंडळाच्यावतीने शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेमध्ये साकारलेल्या रायगड प्रतिकृती व लाईट अॅण्ड साऊंड शो उद््घाटन सोहळ्याचे. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा 16 वे वर्ष आहे. उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात लिंगाणा किल्ला 32 मिनीटात सर करणारे अनिल वाघ आणि आग्रा ते राजगड पायी प्रवास करणारे मारुती गोळे यांचा साहसवीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
डॉ.रामचंद्र देखणे म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास हा गड-किल्ल्यांच्या अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा प्रत्येकामध्ये चेतना, उर्जा आणि चैतन्य निर्माण करणारा आहे. पुरुषार्थ आणि परमार्थाने महाराष्ट्राचे वेगळेपण आजपर्यंत टिकवून ठेवले आहे. गड-किल्ले ही पुरुषार्थाची तीर्थ असून शिवरायांच्या मावळ्यांची ही पंढरी जपण्यासाठी आपण प्रत्येकाने पुढे यायला हवे.
मोहन शेटे म्हणाले, प्रदर्शनात चाळीस फूट लांब व तीस फूट रुंद असा भव्य रायगडाचा माथा दाखविण्यात आला आहे. यामध्ये नगारखाना, राजसभा, मनोरे, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर या प्रमुख इमारती आणि त्यांचा इतिहास उलगडला जाणार आहे. तसेच विविध चित्रफितींच्या माध्यमातून रायगड किल्ल्याचे भौगोलिक व ऐतिहासिक दर्शन घडविण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर नगारखान्यापासून जगदिश्वराच्या मंदिरापर्यंत हत्तीवरून काढण्यात आलेल्या मिरवणूकीच्या प्रसंग साकारण्यात आला असून, हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे.
रायगडावरील इमारतींचे आर्किटेक्चर डिझाईन तयार करून वीस महाविद्यालयीन तरुणांनी विविध तज्ज्ञांकडून माहिती मिळवून या वास्तू साकारल्या आहेत. संकेत वीरकर, मुकुल येनगुल, ओंकार कोंडे या आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी प्रतिकृती साकारण्यात सहभाग घेतला. रसिकांना या किल्ल्याची प्रतिकृती सोमवार, दि. 23 आक्टोबर पर्यंत दररोज सकाळी 9 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत पाहता येणार आहे.