पुणे : अनेकदा खेडोपाड्यात गर्भवती महिलांना पोषक आहार न मिळाल्यामुळे जन्मलेले मुल हे कुपोषित असते. राज्यातील अनेक आदिवासी भागात कुपोषणामुळे बळी जाणाºया मुलांची संख्या देखील वाढत आहे. अशा भागातील मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि प्राथमिक शिक्षणासाठी लायन्स क्लबने पुढाकार घेतला आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डि-२ व मनस्वीतर्फे पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध खेड्यात १०० अंगणवाड्या दत्तक घेऊन तेथील कुपोषित मुलांकरीता काम करण्यात येणार आहे.
एरंडवणा येथील कावेरी इन्स्टिट्यूटमध्ये लायन्स क्लब पुणे मनस्वीच्या पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुपोषण निर्मूलन, १०० अंगणवाड्या दत्तक योजना व १०० आदर्श अंगणवाडी या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. लायन्स क्लब आॅफ इंटरनॅशनलचे कार्यकारी प्रशासक डॉ. नेव्हेल मेहता, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गिरीश मालपाणी, पूर्व प्रांतपाल राज मुच्छाल, मनस्वीच्या संस्थापकीय अध्यक्षा भाग्यश्री चौंडे, उपप्रांतपाल रमेश शहा, ओमप्रकाश पेठे , प्रदेशाध्यक्ष परमानंद शर्मा, लायन्स क्लब पुनाचे अध्यक्ष रामानंद अय्यर व लायन्स क्लबचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध लायन्स क्लबच्या अध्यक्षांनी या उपक्रमासाठी देणग्या दिल्या.
गिरीष मालपाणी म्हणाले, लायन्स क्लब आॅफ इंटरनॅशनलतर्फे विविध खेड्यातील १०० अंगणवाड्या दत्तक घेण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा प्रारंभ झाला असून या योजनेत लायन्स क्लब आॅफ पुणे मनस्वीचे मोलाचे कार्य असणार आहे. योजनेअंतर्गत बालवाडीमधील मुलांच्या शारीरिक विकासाकरीता पोषक आहार तसेच त्यांच्या बौद्धीक विकासासाठी देखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
भाग्यश्री चौंडे म्हणाल्या, या सर्व उपक्रमांमधून एकुण ३८००० ते ४८००० लाभार्थींना आगामी काळात लाभ मिळणार आहे. या उपक्रमास जिल्हा परिषद पुणे, सीएसआर, विविध नामांकित संस्था, लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशन यांचे देखील सहकार्य मिळणार आहे.