पुणे : अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने कृषीतज्ञ प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्या मनातले कागदावर या पुस्तक प्रकाशन देखील होणार आहे. गुरुवार, दि. ४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृह येथे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांच्या पंचाहत्तरीनिमित्त या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुस्तकामध्ये प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांच्याविषयी अनेकांनी सांगितलेल्या आठवणींचा समावेश आहे.
कार्यक्रमाला पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले उपस्थित राहणार आहेत. प्रा. डॉ. बळवंतराव खंडेराव जगताप हे बारामती तालुक्यातील पणदरे गावचे शेतकरी. महाराष्ट्रात शेती क्षेत्रात संशोधन करून अमेरिकेसारख्या प्रगत देशात डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. डॉ. जगताप यांनी शेती क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करून अनेक नवीन योजना शासनापुढे सादर केल्या आहेत. कृषी क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे विद्यार्थी आहेत.