सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कोकण म्हणजे परंपरानचा म्ह सागर. अनेक लोककला आजही येथे तग धरून आहेत. दशावतारासारखी लोककला येथे जन्मली, वाढली, सातासमुद्रापार गेली. त्याच परंपरेत शिमगोत्सवातला ‘गोमूचा नाच’ म्हणावा लागेल. कणकवली तालुक्यातील आशिये ठाकूरवाडी मधील तरुण आणि जाणकार आजही हा नाच करतात व शिमगोत्सवात आवर्जून लोकांचे मनोरंजन करतात.
खर सांगायचं तर ‘गोमूच्या’ पायातील घुंगरांच्या आवाजाने आणि नाचाने कोकणातील शिमगोत्सवाला खरी रंगत निर्माण होते. कोकणातील शिमगोत्सवाचे वेगळेपण काही निराळेच असते. शिमगोत्सवात कोकणात वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात त्यातलीच एक शेकडो वर्षांपासून गोमूच्या नाचाची ही आगळी वेगळी परंपरा कोकणातील शिमगोत्सवाचं मुख्य आकर्षण असते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात ती तितक्याच भक्तिभावाने आजही जोपासली जाते.
शिमगोत्सवामध्ये होळीच्या कालावधीत गावागावातील मंडळाच्या वतीने ‘गोमूचा नाच’ खेळला जातो, शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा काही निराळीच आहे, एका मुलाला एका स्त्रीचा वेष परिधान केला जातो, साडी नेसवली जाते, पायात घुंगरू घातले जातात आणि या गोमूला म्हणजेच पात्राला गावागावात आणि संपूर्ण शहरात फिरवलं जातं. या पत्रासोबत पुराणातील अन्य पात्रांचे वेश परिधान केलेलीही पत्रे असतात.
घरांसमोर तसंच दुकानांसमोर त्याचे नाच केले जातात, लोक धार्मिक भावनेतून त्यांना दक्षिणा देतात अशा प्रकारे जमा झालेली दक्षिणा एकत्र करून त्याचा नैवेद्य केला जातो आणि तो घरी नेला जातो. गावागावात, दुकानांसमोर संकासुर, तसंच राधा-कृष्णची गाणी, ढोलकी,टाळ,तुणतुण्याच्या तालावर म्हटली जातात.
गोमूच्या पायातील घुंगराच्या आवाजाने शिमगोत्सवाला कोकणात चांगलीच रंगात अाली आहे.आशीयेतील ठाकूरवाडीतील तरुणांनी हि परंपरा आजही जोपासली आहे.