आनंद अतुल हुले
सुमारे ६५ वर्षापूर्वी मालवणला आचार्य अत्रेंच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन भरले होते. मुंबई – मालवण हा कोकणबोटीचा प्रवास सर्व साहित्यिकांनी केला. सकाळी मालवण बंदरांत कोकणबोट आल्यावर किनारपट्टीचे निसर्गसौंदर्य पाहून सगळे हरखून गेले. आचार्य अत्रे तर कोकणबोटीच्या प्रवासावर इतके खूष झाले की, त्यांनी जाहीर केले “कोकणबोटीची मजा लुटण्यासाठी पुढील ३-४ साहित्य संमेलने मालवणलाच भरवावी.” हिच संकल्पना पुढे “टुरीझम क्रूझ’ म्हणून पुढे आली. साधारणतः ३० वर्षापूर्वी आग्नेय आशियात स्टार क्रूझची टुरीझम क्रूझ सुरू झाली आणि जागतिक मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या मलेशिया, थायलंड, इंडेनेशीया, बाली या आग्नेय आशियातील देशांची अर्थव्यवस्था पर्यटनाच्या माध्यमातून मजबूत झाली. बोटीतून येणारा एक पर्यटक गावातील ७ स्थानिकांना रोजगार देतो हा जागतिक मापदंड आहे. अशी बोटसेवा कोकण किनारपट्टीवर नसल्याने कोकणकिनारपट्टीचा पर्यटनविकास आगमनाने गेली २५ वर्षे प्रलंबीत आहे. कोकणबोटीची सुविधा नसल्याने दापोली ते वेंगुर्ला येथील सर्व पर्यटक व्यवसायीक नुकसानीत भरडले गेले आहेत. कारण पुरातन दिपगृहे, ऐतिहासीक जलदुर्ग, शिवकालीन बंदरे, अथांग अरबी सागर, पांढरेशुभ्र किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, निळाशार समुद्र, बॅकवॉटर, आध्यात्मिक देवळे, खट्याळ डॉल्फीन, झणझणीत मालवणी जेवण, दणकेबाज लोककला ही पर्यटनाची सर्व अंगे दाखविणारी मुंबई-गोवा ही जगातील एकमेव किनारपट्टी आहे. कोकणातील बंदरातून जलवहातूक सुरु व्हावी म्हणून मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकरशेठ, संसदपटू बॅ. नाथ पै, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शिवसेना नेते वामनराव महाडिक, बंदर विकासमंत्री भाई सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी त्या त्या काळात प्रामाणिक प्रयत्न केले. या प्रयत्नांना आता यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. खालील सागरी मार्गावर बोटसेवा चालविण्यास शासनाने परवाने वितरीत केले आहेत. २०१७ अखेरीस बोटसेवा चालू होण्याची शक्यता आहे.
कोकण किना-यावर चालू होणा-या बोटसेवा१) रो-रो बोटसेवा- मुंबई-अलिबाग- मुंबई-नेरूळ सागरी मार्गावरील रो-रो बोटसेवा प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. पहिल्या टप्यात मुंबई-अलिबाग रो-रो बोटसेवा तर दुस-या टप्यात याच बोटसेवेचा सिंधुदुर्ग – गोव्यापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनानाकडून परवाने/मंजूरी मिळताच त्वरीत ही बोटसेवा वेंगुर्ला, विजयदुर्ग, जयगड बंदरातून चालू करून तेथील लॉजिस्टीक पार्क विकसीत केले जातील.फायदे- १) महाराष्ट्र शासनास वर्षाला ५०० कोटीचा महसूल. २) मुंबई-गोवा महामार्गावरील हजारो बळी घेणा-या अपघातांना पायबंद. ३) हजारो कोटीच्या डिझेलची पर्यायाने परकीय चलनाची बचत. ४) शेतीमाल/आंबे/मासे/दुग्ध-फलोत्पादन यांची नासाडी थांबून निर्यातीला चालना. ५) गेली ५० वर्षे रखडलेले बंदरप्रकल्प बहुद्देशीय धोरणानुसार वर्षभरात कार्यान्वीत. ६) कोकणातील औद्योगीकरणाला चालना मिळून रोजगार उपलब्धता. ७) वेंगुर्ला, विजयदुर्ग, जयगड, पणजी बंदरातून रो-रो बोटसेवा सुरू केल्यास कुडाळ, पश्चिम महाराष्ट्र, बेळगाव, येथील औद्योगिक व दुग्ध, शेतीमाल निम्या किंमतीत मुंबईत. ८) महाराष्ट्र एस.टी/गोवा कदंबा महामंडळास दोनशे कोटीचे उत्पन्न अपेक्षीत.वस्तुत: प्रवासी वहातुकीतून एस.टी आगारांना प्रती किमी सुमारे २५ रुपये तोटा होत असून एस.टी महामंडळाला सुमारे २००० कोटीचा वार्षिक तोटा सहन करावा लागत आहे. एस.टी महामंडळातर्फे कोकणबोटसेवा चालवावी अशी भाजपचे आमदार कै. हशू अडवाणी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत सूचना केली होती.
२) मुंबई – दिघी सागरी मार्गावरील प्रवासी बोटसेवा- मुंबई – दिघी सागरी मार्गावर आज दररोज १०००० प्रवाशी प्रवास करतात त्यासाठी ६ ते ८ तास लागतात. त्याचे एस.टी.चे तिकीट ४५० रु. आहे. या सागरी मार्गावर भाऊच्या धक्का ते दिघी बंदर दोन तासात पार पाडणारी एयर कंडीशन कॅटामरान प्रवासी बोटसेवा सुरू होत असून त्याचे तिकीट ६०० रु. असेल.
३) मुंबई- गोवा सागरी मार्गावरील प्रवासी बोटसेवा- मुंबई- गोवा सागरी मार्गावर आज दररोज ५००० प्रवाशी प्रवास करतात त्यासाठी १४ ते १६ तास लागतात. त्याचे बसचे तिकीट ४५० ते २००० रु. आहे. या सागरी मार्गावर भाऊचा धक्का ते पणजी बंदर ७ तासात पार पाडणारी एयर कंडीशन कॅटामरान प्रवासी बोटसेवा सुरू होत असून त्याचे तिकीट २००० रु. असेल.
४) मुंबई-जयगड सागरी मार्गावरील प्रवासी बोटसेवा- मुंबई- जयगड सागरी मार्गावर आज दररोज पाच हजार प्रवाशी प्रवास करतात. त्यासाठी १४ ते १६ तास लागतात. त्याचे एस.टीचे तिकीट ३५० रु आहे. या सागरी मार्गावर भाऊचा धक्का ते जयगड बंदर ४ तासात पार पाडणारी एयर कंडीशन कॅटामरान प्रवासी बोटसेवा सुरू होत आहे. त्याचे तिकीट १००० रु. असेल.हे तिकीटाचे दर आवाक्यात येण्यासाठी कोकण बोटसेवेचे आयातशुल्क माफ करावे व लागणारे इंधन करमुक्त करावे अशी मागणी कोकणवासीयांतर्फे करण्यात येत आहे. कोकण बोटसेवा ही मेक इन महाराष्ट्र व सागरमाला या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या प्रकल्पातील महत्वाचा दुवा आहे. कोकण किनारपट्टीवरील उत्तरेतील डहाणू ते दक्षिणेतील रेडी बंदरातून किनारा जलवहातुकीने मालहाताळणी करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. किनारा जलवहातुकीने मालहाताळणी केल्यास वहातुक खर्चात ७० टक्के बचत होते हे चीनने सिध्द करुन दाखविले आहे. केंद्र सरकारलाही याची खात्री पटल्याने केंद्र सरकारनेही पंतप्रधान जलमार्ग योजनेची घोषणा केली आहे. भारताचा मालहाताळणीपैकी किनारा जलवहातुकीचा हिस्सा ३ टक्के तर चीनचा २५ टक्के. आहे. लघुबंदरातील किनारा जलवहातुकीमुळे चीनचा मालवहातूकीचा खर्च भारताच्या १/३, आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यपारउदीमात भारतावर कुरघोडी करून स्पर्धात्मक कमी किमतीत माल विकणे चीनला शक्य होते. चीनची बंदरक्षमता भारताच्या ३० पट आहे. सागरमाला प्रकल्पामुळे भारताची मालहाताळणी २०२५ पर्यंत अडीचपट वाढून १००० मिलीयन टनापासून २५०० मिलीयन टन अपेक्षितआहे. या प्रकल्पामुळे भारताची किनारा जलवहातुक क्षमता २०२० पर्यंत तिप्पट वाढून ६० मिलीयन टनापासून २०० मिलीयन टन अपेक्षित आहे.