विवेक ताम्हणकर
कोकणातील बेरोजगारांना रोजगारक्षम बनवायचे असेल तर येथील शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल आणि नव्याने वाढ करावी लागेल या शिक्षणतद्न्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई विद्यापीठाने २०१२ सालच्या बृहत् आराखड्यात नव्या शैक्षणिक धोरणांचा समावेश केला होता. त्यात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय, समुद्र विज्ञान, संस्कृती, शेती आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणा-या अनेक महाविद्यालयाची गरज असल्याची सूचना मांडली होती मात्र याबाबत सकारात्मक विचार शासन आणि शिक्षण खात्याच्या पातळीवर होत नसल्याने कोकणचा शैक्षणिक विकास कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे
सन २०१३ ते २०१८ या पाच वर्षात अनेक विषयांच्या नवीन महाविद्यालयांची गरज निर्माण होईल, अशी दाट शक्यता मुंबई विद्यापीठाच्या या बृहत् आराखड्यात व्यक्त करण्यात आली होती. हा आराखडा प्रत्यक्षात आल्यास या आराखडय़ानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध अभ्यासक्रम शिकविणारी सर्वाधिक महाविद्यालये स्थापन होतील. त्यानंतर रत्नागिरी, ठाणे आदी जिल्ह्यांमध्ये या महाविद्यालयांची स्थापना होईल. येत्या पाच वर्षात पुणे, मुंबई आदी शहरात शिकविण्यात येणारे बहुतांश सर्व उच्चशिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध होतील. या आराखड्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान ३०, रत्नागिरीत २४, रायगडमध्ये २३, ठाणे जिल्ह्यात २०, तर नवी मुंबईत ५ अशा विविध अभ्याक्रमांच्या महाविद्यालयांची आवश्यकता निर्माण होणार आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय, समुद्री विज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी ग्रामीण विकास, कम्युनिटी महाविद्यालय, मासे व्यवस्थापन, संस्कृती, डिप्लोमा इन फिशींग, फूड प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग, डिप्लोमा इन टुरिझम, फाईन आर्टस्, बायो सायन्स, फंडामेंटल सायन्स, उद्यान व्यवस्थापन अणि बुद्धिस्ट स्टडी आदी विषयांच्या नव्या महाविद्यालयांची गरज आहे.
सध्या कोकणातील जिल्हानिहाय आवश्यकता असलेली महाविद्यालये पुढील प्रमाणे
सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यात फंडामेंटल सायन्स, मॅथ्स, केमिस्ट्री, बायोसायन्स, बॉटनी, झूलॉजी, मार्केटिंग अँड मॅनेजमेंट एज्युकेशन, ग्रामीण विकास, बी.एड्, अभियांत्रिकी, पर्यटन, ओरस येथे कम्युनिटी महाविद्यालय, बीपीएड, सावंतवाडी तालुक्यात फाईन आर्ट्स, क्राफ्ट अँड आर्ट्स, डिप्लोमा इन टुरिझम बांदा आणि दोडामार्ग येथे बायोसायन्स, ग्रामीण विकास, व्यावसायिक अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट वेंगुर्ला तालुक्यात डिप्लोमा इन फिशिंग, ग्रामीण विकास, पर्यटन, मालवण तालुक्यात पर्यटन, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, देवगड तालुक्यात हॉर्टिकल्चर, फूड प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग
रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यात सायन्स, व्यवसाय अभ्यासक्रम, हॉर्टिकल्चर दोन व तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम, पॅकेजिंग, केमिस्ट्री कोर्स. मंडणगड तालुक्यात संगणकशास्त्र आणि बायोलॉजिकल सायन्स. देवरुख आणि लांजा येथे सायन्स, हॉर्टिकल्चर दोन व तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम, फिजिकल एज्युकेशन, ग्रामीण विकास, आटोमोबाइल रिपेअरिंग, फिश प्रोसेसिंग, आंबा आणि फळ प्रक्रिया अभ्यासक्रम. राजापूर, रत्नागिरी शहर येथे मरिन जिओलॉजी, कोस्टल इकोलॉजी, फिश कल्चर, नौसेना अभियांत्रिकी आदी महाविद्यालयांची गरज आहे. मुंबई विद्यापीठाचा बृहत् आराखडा प्रत्यक्षात आल्यास शिक्षणाच्या या गरजा मार्गी लागून कोकणातील विद्यार्थ्याना व्यवसायपूरक शिक्षण मिळणार आहे मात्र गरज आहे ती इच्छाशक्तीची.