कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक यावेळी तिरंगी होणार असून राष्ट्रवादीला ही निवडणूक जड जाणार आहे. दुसर्या बाजूला भाजपची ताकद वाढल्याने स्वाभिमान व भाजप यांच्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण होणार आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा तिरंगी लढतीत यावेळी मोठी रस्सीखेच होणार आहे.२१ मे रोजी निवडणूक होत आहे. दरम्यान कोकणची जागा भाजपने स्वाभिमानाला सोडल्यास राष्ट्रवादीला ताकद मिळू शकते.
दर सहा वर्षांनी कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघात निवडणूक होते. गतवेळी राष्ट्रवादीचे अनिल तटकरे हे विजयी होऊन शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. आघाडीच्या सत्ता काळात रायगडमध्ये आ. सुनील तटकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आपले बंधूच निवडणुकीत उतरल्याने त्यांनी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंत्रणा राबवली. रत्नागिरी जिल्ह्यात माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, सिंधुदुर्गमध्ये माजी मंत्री नारायण राणे यांच्यामुळे राष्ट्रवादीने या जागेवर यश मिळविले. मात्र, आता या तिन्ही जिल्ह्यातील राजकारण पूर्णत: बदलले आहे. यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीवर त्याचे परिणाम होणार आहेत.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, जि. प.चे सदस्य मतदान करतात. परंतु यावेळी तिन्ही जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. अनेक ठिकाणी भाजपचे नगरसेवक, नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. सध्या भाजपची या निवडणुकीसाठी युती झाली नाही तर तिरंगी लढत होईल आणि राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांच्यामध्ये चुरशीचा सामना होणार आहे. या तिरंगी लढतीमध्ये स्वाभिमानची ताकद स्पष्ट होणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये शेकाप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि स्वाभिमान प्रबळ आहे. अशाही परिस्थितीत सर्वच ठिकाणी भाजपने शिरकाव केला आहे. यामुळे या वेळच्या निवडणुकीत भाजप मतांसाठी ताकद पणाला लावणार आहे. अजूनही कोणत्याही पक्षाने उमेदवाराबाबत घोषणा केलेली नाही. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सेनेची २४७, भाजपची १३५ अशी ३८२ मते आहेत. राष्ट्रवादीकडे १५५ व काँग्रेसकडे १३३ अशी २८८ मते आहेत, तर नुकत्याच स्थापन झालेल्या. आ. नारायण राणे यांच्या पक्षाकडे स्वाभिमानची मते आहेत. मात्र, खा. राणे यांच्याकडील काही मते ही मूळ काँग्रेसची आहेत.
काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले काही लोकप्रतिनिधी स्वाभिमान पक्षात गेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाभिमानची ताकद असल्याने स्वाभिमानची मते भाजपच्या बाजूने वळतील असे मानले जात आहे. तर कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वाभिमानाला केलेली मदत लक्षात घेता त्याची परतफेड म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला स्वाभिमान मदत करू शकत असं जाणकारांचं मत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि सेना, भाजपचा स्वबळाचा नारा यामध्ये स्वाभिमानच्या मताना मोठी किंमत असून विधान परिषद निवडणुकीत स्वाभिमानची मते प्रभावी ठरणार आहेत. केंद्र व राज्यात सत्तेवर असलेला भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्षातील मते फोडण्यासाठी ताकद पणाला लावेल, अशी चर्चा रंगू लागली आहे.