खवळे गणपती: एक ऐतिहासिक वारसा

September 6th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

हेमंत कुलकर्णी,देवगड

आजही कोकणात सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे सण व उत्सवांची परंपरा येथे पूर्वापार चालत आलेली संस्कृती आजही त्याच भक्तिभावाने व श्रद्धेने जोपासली जाते. संपूर्ण कोकणचा प्रांत हा विविधतेने नटलेला असून त्याला समृद्ध कला, साहित्य व संस्कृतीचे अधिष्ठान लाभले आहे. १४ विद्या व ६४ कलांचा आधिपती मानला जाणारा श्री गणपती कोकणातील घरोघरी मूर्तीच्या स्वरूपात आणून पूजला जातो. विविधतेने नटलेल्या सिंधुदुर्गातील देवगड येथून २ कि. मी. अंतरावरील ऐतिहासिक ‘तारामुंबरी’ गावातील ‘खवळे’ या कुटुंबामध्ये गेली ३१५ हुन अधीक वर्षे गणपती उत्सव साजरा केला जात आहे. याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली गेली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुराब जातीच्या जहाजांचा प्रमुख तांडेल असलेला शिव तांडेल यांचा वंश वाढत नव्हता. मालवण-मालाडी गावातील नारायण मंदिरात ते दररोज पूजा करीत असत. याच मंदिरातील गणपतीची मूर्ती त्यांच्या स्वप्नात आली आणि ‘माझा मोठा उत्सव कर, तुला पुत्ररत्न होईल’ असा दृष्टांत दिला. शिव तांडेलने छत्रपतींच्या सरदाराला शोभेल असा १७०१ मध्ये उत्सव चालू केला, तोच हा उत्सव खवळे महागणपतीच्या नावे प्रसिद्ध आहे. कालांतराने त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव गणोजी असे ठेवले. १७५६ साली गणोजी विजयदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांशी लढताना पकडले गेले. त्यांना शिक्षा झाली. आजही गणोजी सरदाराची समाधी तारामुंबरी येथील खवळे घराण्याच्या क्षेत्रात आहे. गणोजी यांची नववी-दहावी पिढी महागणपतीचा उत्सव साजरा करीत आहे. अनेक वैशिष्टय़ांमुळे या गणपतीची दखल लिम्का बुकने घेतली. याच गणोजी यांची  १०वी पिढी तितक्याच आनंदाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना त्याला जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न करताना दिसतात. या गणपतीचे ऐतिहासिक महत्त्व आजही जपले जात आहे. येथील ठरलेल्या शेत जमिनीतील दीड टन साधी माती लाकडी घाण्याने मळून त्याचे गोळे केले जातात. महागणपतीची मूर्ती श्रावण नारळी पौर्णिमेच्या दिवसापासून बनविण्यास प्रारंभ होतो. ही मूर्ती खवळे घराण्यातील पुरुष बनवितात. विशेष म्हणजे ही मूर्ती साच्याशिवाय बनविली जाते. दरवर्षी कोणताही बदल न करता एकच आकार, तेच रूप व रंग आणि उंची असते. ही मूर्ती बैठी पावणेसहा फूट उंचीची असते. गणेश चतुर्थीला या महागणपतीच्या संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून पूजा केली जाते. तर दुस-या दिवशी उंदीर पूजेला लावतात. फक्त डोळे रंगविले जातात व विधिवत पूजा केली जाते. तिस-या दिवशी रंग कामाला सुरुवात होते. तर पाचव्या दिवशी संपूर्ण रंगकाम पूर्ण होते. संपूर्ण अंगाला लाल रंग, चंदेरी रंगाचा अंगरखा, पिवळे पीतांबर, सोनेरी मुकुट, त्यावर पाच फण्यांचा नाग, मागे गोल कागदी पंखा व हातावर शेला अशी विलोभनीय मूर्ती साकारली जाते. नंतर ७, ११, १५, १७ व २१ व्या दिवशीपर्यंत सतत रंगकाम सुरूच असते. विसर्जनाच्या दिवशी दुपारी मूर्तीच्या लाल रंगाच्या चेहऱ्यावर पिवळे ठिपके दिले जातात.त्यामुळे मूर्तीचा चेहरा काहीसा उग्ररूप धारण केल्याप्रमाणे दिसते. अशा प्रकारे २१ दिवसात विविध रूपे साकारणारा असा हा एकमेव महागणपती असावा. पहिले पाच दिवस दोन वेळा व नंतर दिवसातून तीन वेळा आरती केली जाते. दररोज रात्री भजन केले जाते. पाचव्या दिवसापासून रोज तिन्ही सांजेला लहान मुला प्रमाणे घरातील जाणकार महिलांकडून गणपतीची दृष्ट काढली जाते. हे एक विशेष म्हणावे लागेल. अलीकडे भाविकांची गर्दी वाढू लागल्याने हा उत्सव २१ दिवस अधिकाधिक जल्लोषात साजरा करण्यात येतो. दर्शनासाठी भाविकांप्रमाणेच राजकारणी व सेलिब्रिटींची उपस्थितीही लक्षणीय असून सर्वाचे आदरातिथ्य करण्यात खवळे बंधू कमालीचे व्यस्त असतात. विसर्जनाच्या आदल्या दिवशीची रात्र लकीत अर्थात जागर म्हणून साजरी केली जाते. या वेळी संध्याकाळी खवळे घराण्यातील पूर्वजांच्या पगडय़ांची विधिवत पूजा केली जाते. त्यास ‘जैनपूजा’ म्हणतात. या वेळी विशिष्ट आरती म्हणताना भजन, नृत्ये, नाटय़छटा व फुगडय़ांचा कार्यक्रम सादर केला जातो. मध्यरात्री तमाशाचे आयोजन केले जाते.  पहाटे नवस फेडणे व नवे नवस बोलणे, पुरुषांचा फुगडय़ांचा कार्यक्रम व महागणपतीची आरती करून दृष्ट काढली जाते. विसर्जनाच्या दिवशी सकाळी खवळे कुटुंबीयांच्या पूर्वजनांना ‘पिंडदान’ केले जाते. गणेशोत्सवात पिंडदान होणारा हा एकमेव गणपती असावा. या वेळी भाविकांना दुपारी महाप्रसाद दिला जातो. याचे विसर्जन मंगळवार व शनिवार या दिवशी केले जात नाही. विसर्जन सोहळाही भव्यदिव्य स्वरूपात असतो. मूर्ती गाडीवर रथात बसवली जाते. ढोल, ताशे, लेझिम या वाद्यांसह भगवे झेंडे, तलवारी नाचवत, फटाक्यांच्या आतषबाजीत ‘मोरयाऽऽऽ’चा गजर करत मूर्तीला गुलाल रंगाची उधळण करीत समुद्रकाठी विसर्जन करण्यासाठी आणतात. तेथे दांडपट्टा, बनाटी, तलवार व लाठी असे शिवकालीन मर्दानी प्रकार खेळले जातात. विसर्जन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविक, खवळे बांधव, त्यांचे सर्व पाहुणे व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित असतात. पुरुष मंडळी फेर धरून नाचू लागले की, निरोपाची वेळ येते. पाण्यात प्रथम उंदीरमामाला नेण्यात येते. नंतर सागाची फळी पाटाखाली घालून महागणपती खांद्यावरून पाण्यात नेला जातो आणि विधीवत विसर्जन केले जाते. खवळे महागणपती ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत खवळे यांच्या प्रयत्नाने विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्यांनी निर्मित केलेला या गणपतीची महती सांगणारा ‘विघ्नहर्ता महागणपती’ हा मराठी चित्रपट आला असून या चित्रपटामुळे या गणराजाची महती सर्वदूर पोहोचली आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions