पुणे – राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी खेळाडूंचा सन्मान अनेकदा केला जातो. परंतु त्यांना घडविणाºया माता देखील तितकीच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. अशा क्रीडा क्षेत्रातील २१ खेळाडूं्च्या मातांचा सन्मान क्रीडा भारती आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाऊ पुरस्कार देऊन करण्यात आला.
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, विद्याधर अनास्कर, अॅड. सुभाष मोहिते, संजय लेले, मिलींद काळे, क्रीडा भारती पुणेचे अध्यक्ष शैलेश आपटे, विजय रजपूत, प्रदिप अष्टपुत्रे, शकुंतला खटावकर, उमेश बिबवे, चिन्मय खरे आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
शांताराम जाधव म्हणाले, क्रीडा क्षेत्रात करीअर करायचे असेल तर आधी शरीर मजबूत असणे गरजेचे आहे आणि शरीर मजबूत ठेवण्यासाठी कष्ट करणे महत्वाचे आहे. शरीर मजबूत असेल तर उत्साहाने काम करता येते. आयुष्यात अनेकदा निर्णय घेताना किंवा कोणतेही महत्वाचे काम करताना लागणारी सतर्कता खेळामुळेच मिळते.
शैलेश आपटे म्हणाले, खेळाडूंना घडविण्यात त्यांच्या आईचा मोठा वाटा असतो. खेळाडूचे जिंकणे आणि हरणे या दोन्ही गोष्टी ती जवळून पाहत असते. त्यामुळे खेळाडूला शिस्त लावण्यासोबतच प्रोत्साहन देखील ती देते. आईच्याच भक्कम पाठिंब्यामुळे खेळाडू चांगली कामगिरी करीत आपले नाव उंचावत असतो. त्यामुळे अशा मातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. राधिका मंडलिक-नगरे यांनी सूत्रसंचालन केले.