गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेचे तिकीट हाऊसफुल्ल झाल्यामुळे खासगी बसगाडय़ांनीही तिकिटांच्या किमती अवाच्या सव्वा वाढवल्या आहेत. कोकणी माणसांची ही होणारी ससेहोलपट आणि लुटमार पाहून स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार नितेश राणे यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. स्वाभिमानकडून येत्या २१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी त्यांना फक्त शंभर रुपये मोजावे लागणार आहेत.
गणेश चतुर्थीनिमित्त कोकणात जाणा-या देवगड, मालवण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आदी तालुक्यांमधील कोकणी जनतेला खासगी बस गाडय़ांच्या एका तिकिटासाठी ८०० ते १२०० रुपये मोजावे लागत आहेत. ही लुटमार लक्षात घेत खासगी बसची सेवा पुरवण्याचा निर्णय नितेश राणे यांनी घेतला आहे. गावी जाणा-यांसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून २१ ते २३ ऑगस्ट रोजी खासगी बस विविध ठिकाणांहून सोडल्या जातीत. मागील वर्षी कोकणातील जनतेला आमदार नितेश राणे यांनी आंदोलन करून टोलमुक्ती मिळवून दिली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही सरकारने चारचाकी वाहने आणि बसेस यांना टोलमाफी जाहीर केलेली आहे. तिकीट नोंदणी केल्यानंतर निश्चित केलेल्या दिवशी मुंबईतील विविध ठिकाणांसह या गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. मागणी वाढल्यास आणखीन गाडय़ा सोडल्या जातील. परंतु कोकणवासीयांची कोणती गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तिकीट विक्रीतील १०० रुपये कोकणातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी तसेच कोकणातील विधायक कामांसाठी वापरला जाणार आहे.
गणेशभक्तांना १०० रुपयांत कोकण प्रवास: आमदार नितेश राणे यांची योजना
Team TNV August 26th, 2017 Posted In: येवा कोकणात
Team TNV