पुणे – देहविक्रीय करणा-या महिलांच्या वस्तीत कोंडलेल्या त्या श्वासांना भाऊबीजेतून नवसंजीवनी मिळाली आणि एखाद्या पुरुषाची वडिल, मामा, काका, मित्र व भाऊ अशी विविध रुपे पाहून त्या भारावल्या. सारेच दगड निष्प्राण नसतात, काही कोंडलेले श्वास असतात… घाव घालताना जपून घाला, काही शापित अहिल्या असतात… या उक्तींप्रमाणे जीवन जगणा-या या महिला. मात्र, भाऊबीजेच्या निमित्ताने गणेशोत्सव कार्यकर्त्यांकडून आपुलकीने केलेली विचारपूस आणि भेट घेताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावाल्या.
विधायक पुणे, वंचित विकास आरोग्य केंद्र आणि पुण्यातील गणेशोत्सव मंडळांतर्फे देवदासींसोबत भाऊबीज या कार्यक्रमाचे बुधवार पेठेत आयोजन करण्यात आले. यावेळी लिज्जत पापड समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश कोते, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश यादव, पुणे सराफ असोशिएशनचे धनंजय दाभाडे, वंचित विकास संस्थेच्या मीना कुर्लेकर, मिनाक्षी नवले, विधायक पुणेचे बद्री मारणे, गिरीष पोटफोडे, चेतन शिवले, गिरीष सरदेशपांडे, आशिष चिंबळकर, विकास भांबुरे, मंगेश कुडले आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला 20 हून अधिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदा 16 वे वर्ष होते.
सुरेश कोते म्हणाले, आपण दगडात देव शोधतो, परंतु माणसांमध्ये देव शोधला पाहिजे. या भगिनींमध्ये ही देव शोधण्याचा प्रयत्न करा. या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्याचबरोबर या महिलांकरीता उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करायला हवा. वाईट कामांची प्रसिध्दी लवकर होते, परंतु अशा चांगल्या कामांची प्रसिध्दी झाली तर समाजात चांगली कामे होतील. त्यामुळे समाजव्यवस्था बदलेल, असेही ते म्हणाले.
प्रकाश यादव म्हणाले, देहविक्री करणा-या महिलांच्या वस्तीत वेगळ्या पद्धतीने भाऊबीज साजरी करुन समाजात या महिलांबद्दल आदराचे स्थान निर्माण करण्यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळे जे कार्य करीत आहेत ते कौतुकास्पद आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झालेल्या या महिलांना सण व उत्सव तितक्याच उत्साहाने साजरे करता यावे, यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.