पुणे – सामाजिक संस्था म्हणून काम करताना समाजाचे आधी मूल्यमापन करायला हवे. मदत करण्याच्या अविभार्वात आपण ज्यांना मदत करतो, त्यांना खरच मदतीची गरज आहे का हे पाहणे देखील आवश्यक आहे. समाजाची मानसिकता बदलणे ही सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे. विनामूल्य मिळालेल्या मदतीची किंमत रहात नाही , मदत करण्यासोबतच श्रमदानाची मानसिकता रुजवायला हवी.असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले.
आर्ट आॅफ लिविंग, एम.आय.टी. स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक संस्था व कार्यकर्ता सक्षमता राज्यस्तरीय कार्यशाळेचा समारोप कोथरुड एम.आय.टी.कॉलेजमधील स्वामी विवेकानंद सभागृहात झाला. यावेळी विश्वंभर चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पद्मिनी स्तंंप, आर्ट आॅफ लिव्हिंगचे शेखर मुंदडा, डॉ. एस. हरीदास, डॉ. रवी कसबेकर, विजय वरुडकर यावेळी उपस्थित होते.
डॉ. विश्वभंर चौधरी म्हणाले, आपल्याकडे ज्या सामाजिक संस्था आहेत, त्या मुख्य:त दुर्बल घटकांसाठी काम करणाºया आहेत. त्या संस्था असायलाच हव्यात परंतु अशा सामाजिक संस्थाचे स्वप्न आपण पाहिले पाहिजे ज्या उत्क्रांतीसाठी, जैवतंत्रज्ञानासाठी, संशोधनासाठी काम करतात. जग फार वेगाने पुढे जात असताना आपल्या ज्ञानात वाढ कशी होईल याचा विचार केला पाहिजे.
शेखर मुंदडा म्हणाले, वैचारीक कौशल्य वापरुन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संस्थांनी समाजासाठी अधिकाधीक कार्य करायला हवे. यासोबतच काळाच्या बरोबर जाताना आधुनिक माध्यमांचा वापर करीत आपले कार्य देखील समाजासमोर ठेवायला हवे. या राज्यस्तरीय कार्यशाळेनंतर राज्यातील १००० संस्थाना एकत्र आणून त्यांचे दोनदिवसीय प्रदर्शन भरवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. एम.आय.टी. स्कूल आॅफ गव्हर्नमेंटचे राहुल कराड हे कार्यशाळेचे संयोजक असून त्यांचेही विशेष सहकार्य या कार्यशाळेला मिळाले. प्रिती काळे यांनी सूत्रसंचालन केले.