पुणे – शिक्षण क्षेत्रातील समस्यांना सामोरे जाताना,पालकांची मानसिकता बदलणे हे प्रमुख आव्हान आपल्या देशासमोर आहे. विद्यार्थ्यांना स्वइच्छेनुसार शिक्षण घेण्यासाठी पालक प्रवृत्त झाले पाहिजे. पुढची यशस्वी तरुण पिढी घडवण्यासाठी पालकांनी मुलांवर त्यांचे भवितव्य लादू नये, असा सूर शिक्षण तज्ज्ञांनी येथे व्यक्त केला. निमित्त होते गोयल गंगा फाउंडेशनच्या वतीने गोयल गंगा इंटनेशनल स्कुलमध्ये झालेल्या शिक्षण क्षेत्राविषयक राष्ट्रीय परिषदेचे.
अनेक अनुभवांचे दाखले देत शिक्षण क्षेत्रातील गंभीर समस्यांवर हळुवार भाष्य करणारे जेरोनिनो अल्मेडा, विग्यानआश्रम संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून अनेक यशस्वी उद्योजक घडवणारे डॉ. योगेश कुलकर्णी, विविध उपक्रमाच्या माध्यमातून चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याचा सकारात्मक दृष्टीकोन जागृत करणाऱ्या आत्मन अकॅडमीच्या मंजुषा पाटील, नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळांचे स्मार्ट शाळेत कायापालट करणारे संदीप गुंड या अनुभवी तज्ज्ञानी या परिषदेच्या माध्यमातून आपली मते मांडली.
यावेळी जेरोनिनो अल्मेडा म्हणाले की, ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे एकीकडे सांगताना दुसरीकडे मात्र अपयशी होऊ नकोस असा धाक पाल्याला दाखवतो, यातून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास विद्यार्थ्यामध्ये आवश्यक असणाऱ्या गुणांचे पालकांकडून अप्रत्यक्षपणे खच्चीकरण केले जाते हे कुठेतरी थांबायला हवे.’ तर ग्रामीण भागात शिक्षणातून उदयोग, उद्योगातून रोजगार निर्मिती करणे, हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करताना आलेल्या समस्या, त्यांवर केलेली मात आणि त्याचा झालेला फायदा याचा आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून डॉ. योगेश कुलकर्णी यांनी घेतला. तर संकोचित मानसिकता दूर करून चौकटीबाहेर विचार करण्याची मानसिकता शिक्षण क्षेत्रात वृद्धिंगत झाली तर अनेक सकारात्मक बदलाचे आपण साक्षीदार असू मत मंजुषा पाटील यांनी व्यक्त केले. पहिल्या सत्राच्या समारोहाला संदीप गुंड यांनी मार्गदर्शन केले. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल शिक्षण अभियानाचा अवलंब करून घडवून आणलेला आमूलाग्र बदल सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितां पुढे उलगडला. तसेच मुलांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण करण्यासाठी त्यांच्या आवडीनुसार शिक्षण पद्धतीत बदल घडवावा असे आवाहनही उपस्थित शिक्षकांना गुंड यांनी केले.
प्रमुख व्यक्तांच्या मार्गदर्शनानंतर ‘नेतृत्व घडवताना’ यांवर चर्चासत्र पार पडले. यामध्ये भूषण पटवर्धन, भरत अगरवाल, सुधीर सिन्हा आणि ऑलिव्ह दास आणि अतुल गोयल यांनी सहभाग घेतला होता. ‘शिक्षण क्षेत्रात केवळ नेतृत्व असून चालणार नाही त्या जोडीला प्रोत्साहनही आवश्यक आहे. चांगला शिक्षकच चांगले नेतृत्व घडवू शकतो.’ असे मत यावेळी सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.
या परिषदेत फाउंडेशनच्या विश्वस्त सोनू गुप्ता, जी. जी इंटरनैशनल स्कूलच्या मुख्यध्यापिका भारती भागवानी यांच्यासह सर्व शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षण क्षेत्रातील बदल, नाविण्यपूर्णता यासंदर्भात प्रामुख्याने या परिषदेत चर्चा झाली. प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर कार्यक्रमाचा समारोह झाला.