पुणे – स्वबळावर स्वतःचे स्थान निर्माण करणा-या कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला. गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने गंगा ग्लिटझ, उड्री येथे आयोजित करण्यात आलेल्या रास दांडिया सोहळ्यात स्मृतीचिन्ह, तुळशीचे रोप देऊन गीता गोयल यांच्या हस्ते या महिलांना सन्मानित करण्यात आले.
गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त गीता गोयल यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक स्तरात कर्तृत्ववान स्त्रिया कार्यरत असताना दिसतात. कोणतीही आशा, अपेक्षा न ठेवता काम करणा-या व प्रसिध्दीपासून दूर असलेल्या गुणवंत स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा यासाठीच आम्ही गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने त्यांना सन्मानित करत आहोत.
पर्यावरणप्रेमी व दिव्यांगासाठी काम करणा-या सुषमा भालेराव या चित्रकार आहेत. विविध सामाजिक उपक्रमात त्या हिरीरीने सहभाग घेतात. अक्षरस्पर्श संस्थेच्या माध्यमातून समाज कार्य करणा-या दिपाली निखील या स्वतःच्या खर्चातून दिव्यांग मुलांचा सांभाळ करतात. आशा मोरे व सविता भोसले या महिलांना दुचाकी व चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देतात. डी. वाय. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचे काम आत्मियतेने करतात.
सातारा येथील बॉक्सींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणा-या कोमल दिगंबर बेलखेडे या तरुणीने खडतर परिस्थितीवर मात करत बॉक्सिंगमध्ये प्राविण्य मिळवत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या स्त्रियांनी स्वतःच्या कार्यातून ओळख निर्माण केली आहे. कर्तव्य भावनेतून त्या हे काम करत आहेत. त्यांचा साधेपणा, कर्तव्याला जागण्याची सेवाभावी वृत्ती ही गौरवास पात्र आहे. त्यामुळेच आम्ही या स्त्रियांना सन्मान करत आहोत. समाजात सकारात्मक भावना वाढीस लागावी हा या पुरस्कारा मागचा हेतू आहे. या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने रासदांडियाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
सलोनी गोयल, अतुल गोयल,जयप्रकाश गोयल आणि बॉईज चित्रपटातील कलाकार दिग्विजय जोशी यावेळी उपस्थित होते. रास दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी जागेगी नारी, तो जागेगा इंडिया असा जयघोष करत सन्मानित करण्यात आलेल्या महिलांच्या कर्तृत्वाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
दिग्विजय जोशी यांनी सूत्रसंचालन केले.