पुणे – देशाच्या स्वातंत्र्यलढयामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणा-या आणि स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी बाबू जगजीवनराम यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम’ या डॉ.विकास आबनावे लिखित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक 28 आॅक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. ग्रंथाचे प्रकाशन लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांच्या हस्ते होणार आहे.
प्रकाशन सोहळ्याला माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बाबू जगजीवनराम यांनी पुण्यामध्ये डिसेंबर 1935 मध्ये पं.मदनमोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू महासभेचे अधिवेशन आयोजित केले होते. त्यामध्ये सुरु केलेला दलितांच्या मंदिर प्रवेशाबाबतचा लढा पुण्यातूनच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविला होता. त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुण्यात होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रंथाचे लेखक डॉ.विकास आबनावे हे टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
डॉ.विकास आबनावे म्हणाले, बाबू जगजीवनराम यांची स्वातंत्र्यसेनानी आणि देशाची माजी उपपंतप्रधान म्हणून सर्वदूर ओळख आहे. मात्र, देशाच्या स्वातंत्र्यलढयातील त्यांचे योगदान, सामाजिक प्रश्नांवरील कार्य आणि स्वातंत्र्योत्तर राजकारणात देशाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने उचलेली पाऊले याविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे त्याविषयी सविस्तर लेखन करुन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा प्रयत्न ग्रंथाच्या माध्यमातून केला आहे.