गरज नसताना महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीत अवास्तव कर्मचारी आणि सफाई कामगारांची भरती करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे. काही कामगारांना तर महापालिका स्थापना होण्याच्या काही दिवस अगोदर कामावर घेतले असल्याची बाब उघडकीस आली आहे. संबंधीत भरती आरक्षणानुसार झालेली नाही, या सर्व गोष्टींचे ऑडीट करण्यात येत आहे.
पनवेल महापालिकेत २९ गाव समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार २३ ग्रामपंचायती बरखास्त करून त्या महापालिकेकडे वर्ग करण्यात आल्या. ग्रामपंचायती कार्यालयात सदया मनपाचे विभागीय कार्यालय सुरू आहेत. दरम्यान या ग्रामपंचायतीत लिपिक तसेच सफाई कामगार म्हणून पदाधिकार्यांनी आपल्या नातेवाईक तसेच मर्जीतील लोकांना भरती केले. अनेक ग्रामपंचायतीत चार ते पाच जणांची आवश्यकता होती तिथे ३० ते ४० जणांची भरती करण्यात आली. तर काही ठिकाणी ५० जण काम करीत आहेत.
थक्क करणारी गोष्ट म्हणजे महापालिकेची स्थापनेची कुणकुण लागताच काही ग्रामपंचायतीत पदाधिकार्यांनी नातेवाईक तसेच हितचिंतकांची नावे यादीत टाकून दिल्याचा आरोप होत आहे. जेणेकरून महापालिकेत संबंधीतांना कायम करून घेतले जाईल. त्याचबरोबर त्यांना वेतनही चांगले मिळेल हा त्या पाठीमागचा उद्देश असल्याचेही बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यापासून या कामगारांना वेतन मिळत नसल्याची ओरड होत आहे. याविरोधात राजकिय पक्षांनीही आवाज उठवला. या सर्वांना महापालिकेत कायम करून घेण्याबरोबरच त्यांना नियमीत वेतन देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परंतु महापालिका प्रशासनाने याबाबत निर्णय घेतलेला नाही. बुधवारी झालेल्या महासभेत शेकाप नगरसेवक हरीष केणी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. या विषयावर काही वेळ चर्चा सभेत झाली; परंतु ग्रामपंचायतीने केलेल्या भरतीवर काही सत्ताधारी नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. जगदीश गायकवाड यांनी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप करत भरतीत भ्रष्टाचार झाला असल्याचेही ते म्हणाले.
सर्व गोष्टींची पडताळणी करणार – आयुक्त डॉ. शिंदे
आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी ग्रामपंचायतीने गरजेपेक्षा जास्त मनुष्यबळ घेतले असल्याचे मान्य केले. हे कर्मचारी किंवा कामगार भरती करताना आरक्षणाचा विचार केला की नाही याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. याविषयी सर्व गोष्टींची पडताळणी केली जाणार आहे. कोकण विभागीय कार्यालयातून आठ दिवसात अहवाल प्राप्त होईल असे डॉ.शिंदे यांनी सांगितले.