पुणे – दुर्गम भागातील, आदिवासी, वाड्यावस्तीवरील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे. सरकारच्या आरोग्य विषयक सेवा सवलतींचा लाभ शेतक-यांना मिळावा. यासाठी डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन नेहमी पुढाकार घेत असते. त्यांच्या सहयोगाने विश्व श्रीराम सेनेच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांचा आरोग्य जीवनस्तर उंचावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. असे प्रतिपादन विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटनेचे अध्यक्ष लाल बाबू गुप्ता यांनी केले.
शनिवारी (दि. 16 डिसेंबर) विश्व श्रीराम सेना आणि डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चाकण जवळील पिंपरी बुद्रुक येथे राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी डॉ. मनोज तिवारी, डॉ. दिपक कोलते, पंचायत समिती सदस्य कैलास गाळव, गोसासी गावचे सरपंच नारायण पुरी, विश्व श्रीराम सेना आरोग्य मंचचे अध्यक्ष अक्रम शेख, माजी सरपंच संतोष गोरडे, मच्छींद्र भुजबळ, प्रमोदकुमार गुप्ता, नवनाथ हुंडारे, गणेश वाळूंज, आदित्य कुमार, विवेक भुजबळ आणि डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील स्टाफ आदी उपस्थित होते.
पिंपरी बुद्रुक गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी आणि बहुतांश ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये मधुमेह तपासणी, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी, ईसीजी, बीएमआय, नेत्र तपासणी, दंत रोग तपासणी, अस्थिरोग, त्वचा रोग आणि स्त्रीयांच्या आजारांची तपासणी करण्यात आली. या शिबीराचा 397 नागरिकांनी लाभ घेतला. या तपासणी शिबीरानंतर 23 रुग्णांना पिंपरीतील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यलयात मंगळवारी पुढील मोफत उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. यासाठी जाण्या – येण्याची व्यवस्था डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने केली आहे.
स्वागत सरपंच नारायण पुरी, सूत्रसंचालन मच्छिंद्र भुजबळ आणि आभार अक्रम शेख यांनी मानले.