पुणे – जीवनविद्या मिशनच्यावतीने भोसरी येथे सुरु असलेल्या ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळ्यात ‘ग्राहक जनजागृती’ साठी माहिती केंद्र काल सुरू करण्यांत आले. त्याचे उदघाटन अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक कल्याणमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार महेश लांडगे, वाजनमापे विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जीवनविद्या मिशनचे आजी माजी विश्वस्त उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री बापट म्हणाले, जीवनविद्या मिशन ही शैक्षणिक व सामाजिक संस्था मागील 61 वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, स्त्री सन्मान,अवयवदान, ग्राहक संरक्षण आदी विविध क्षेत्रात जनजागृती करीत आहे.
समाजातली प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे. त्याला त्याचे हक्क माहित असायला हवेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळून समाजातील अनिष्ट प्रथांना आळा बसेल. यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नाला जीवनविद्या मिशनचा ही हातभार लागत आहे. महाराष्ट्र शासनाचा वैद्यमापन विभागातर्फे ग्राहकांच्या हक्कांबाबत व्हिडीओज,होर्डिंग्ज, बॅनर यांच्या वापराने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.