पुणे : “आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्यासाठी चांगल्या पर्यावरण आवश्यकता आहे. जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, पाणीटंचाई आदी समस्यांवर मात करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले पाहिजे,” असे मत राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) प्रमुख सारंग आव्हाड यांनी व्यक्त केले.
राउंड टेबल इंडिया पुणे चॅप्टर 15 तर्फे राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी सारंग आव्हाड बोलत होते. याप्रसंगी राउंड टेबल इंडिया पुणेचे चेअरमन देवेश जाटिया, उपाध्यक्ष कपिल शहा, सचिव प्रोमित सूद, हर्निश ठक्कर, अभिषेक मालपाणी, प्रशांत बंब यांच्यासह इतर मान्यवर, सीएआरपीएफचे जवान व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत विविध आठ प्रकारच्या 350 झाडांची रोपे लावण्यात आली. या रोपांचे संवर्धन एसआरपीएफचे कर्मचारी भविष्यात करणार आहेत.
देवेश जाटिया म्हणाले, “समता विद्यालय, सिम्बायोसिस कनिष्ठ महाविद्यालय येथील 30 विद्यार्थी, सीआरपीएफचे 60 जवान आणि राउंड टेबल इंडिया पुणे चॅप्टरचे 40 सभासद या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाले. यावेळी वृक्षारोपणानंतर जवानांनी बंदुकींविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्याची जवळून पाहणी करण्याची मजा घेता आली. राउंड टेबल इंडियातर्फे सेवा सप्ताह राबविला जात आहे.”