रंगूनवाला दंत रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
पुणे : एक वर्ष वयाच्या बालकाला अपघातात जबड्याला दुखापत झाल्यावर त्याचे तोंड उघडणे दुरापास्त होते, तब्बल 38 वर्षांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया होते आणि स्वतःहून जेवणे त्याला शक्य होते !
पुण्यातील राजेंद्र पांचाळ यांची ही सत्यकथा आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयात ही शस्त्रक्रिया डॉ.जे.बी. गार्डे, डॉ. गौरव खुटवड यांनी केली.
महाविद्यालयाच्या वतीने ओरल, मॅाक्सिलोफेशियल विभागाच्या प्रमुख डॉ. अरुणा तंबूवाला यांनी या दुर्मिळ शस्त्रक्रियेची माहिती दिली. ‘इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि अस्थिरोगतज्ञ् डॉ परवेझ इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी ही या शस्त्रक्रियेत मदत केली.
राजेंद्र पांचाळ ( वय 39) यांना ते १ वर्षाचे असताना अपघात झाला होता. तोंड आणि जबडयाच्या हाडांची गुंतागुंत या अपघातात झाल्याने त्यांना तोंड उघडणे अवघड होऊ लागले. त्यांना काहीही चावता येत नव्हते. 38 वर्ष त्यांनी द्रव आणि बारीक केलेल्या अन्नाचा पातळ आहार घेतला. घरची गरीब परिस्थिती आणि अनेक रुग्णालये फिरूनही उपाय न निघाल्याने त्यांना तसेच दिवस ढकलणे भाग पडले.
वैद्यकीय परिभाषेत त्यांना टेम्पोरोमँडीब्युलर जॉईंट अॅंकीलॉसेस ही समस्या उद्भवली होती.पूर्ण जबडयाच्या सांध्याचे प्रत्यारोपण हा एकच उपाय या समस्येवर असतो. आणि ही शस्त्रक्रिया अगदी दुर्मिळ असून क्वचितच करावी लागते.
एम. ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयाने हे आव्हान पेलायचे ठरले. त्यासाठी एम. सी. ई. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी लागेल तो सर्व खर्च करण्याची मुभा दिली आणि शस्त्रक्रियेचा मार्ग खुला झाला.
या कामगिरीबद्दल डॉ. गार्डे व त्यांच्या टीमचे एम. सी. ई. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, सहसचिव प्रा. इरफान शेख, डॉ. रमणदीप दुग्गल, रजिस्ट्रार आर.ए. शेख, सर्व विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले.
पांचाळ यांचा रक्तगट देखील ओ- निगेटिव असा दुर्मिळ होता. महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी अल्पावधीत हे दुर्मिळ रक्त मिळवले, असे महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर.ए. शेख यांनी सांगितले.
जबडा उघडत नसल्याने पांचाळ यांना पारंपारिक पद्धतीने भूल देणे अवघड होते. त्यासाठी फायब्रो ऑप्टिक इंट्यूबेशन पध्दती वापरण्यात आली. त्यानंतर ४ तास शस्त्रक्रिया चालली. ४ जानेवारी रोजी ही शस्त्रक्रिया झाली आणि ५ जानेवारी रोजी रुग्णाला तोंड उघडता येऊ लागले.
राजेंद्र पांचाळ म्हणाले, ‘मी तोंड उघडू शकतो, खाऊ शकतो यावर माझाच विश्वास बसत नाही. अशा पध्दतीने दुर्मिळ शस्त्रक्रिया विनामूल्य होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.
डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘ आमच्या संस्थेचे दंत महाविद्यालय गरजू रुग्णांची वर्षानुवर्ष सेवा करीत आले आहे. पांचाळ यांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचा निर्णय आम्ही लगेच घेतला.
रुग्ण पांचाळ यांचे नातेवाईक यांनी डॉ. गार्डे यांचे अभिनंदन केले.