पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्ुत विद्यामानेे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२१ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप विश्वरूपदर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे आज दुपारी १२.०० वाजता लाखो वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील लाखो वारकर्यांनी गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीेचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गजर केला. या वेळी विश्वरुप दर्शनमंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केद्राच्या वतीने लाखो वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकर्यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. हा उपक्रम यापुढेही चढत्या श्रेणीने चालू राहील.
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, ह.भ.प. श्री. नारायण महाराज उत्तरेश्वर -पिंपरीकर,श्री. तुळसीराम कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या मुख्य समन्वयक डॉ.सुनिल कराड, समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, श्री. बाळासाहेब रावडे, श्री. नंदूकाका वडगांवकर, डॉ. मिलिंद पांडे व पंडित उध्दवबापू आपेगांवकर हे उपस्थित होते.
माऊलीच्या मंदिरात यावेळी खूपच गर्दी असते. त्यामुळे वारकर्यांना दर्शन घेता येत नाही. यासाठी, विश्वरूप दर्शन मंचावरून संजीवन समाधी सोहळ्याचे दर्शन लाखो वारकर्यांना घडविण्यात आले.
या सप्ताहात ह.भ.प.श्री. रामेश्वर शास्त्री, ह.भ.प. श्री. रामराव महाराज ढोक, ह.भ.प.श्री. किसनमहाराज साखरे व ह.भ.प. श्री. बाबामहाराज सातारकर यासारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरूपी सेवा सादर केली. तसेच, डॉ. प्रियंका गुळवणी, डॉ. रेखा नातू, पं.आनंद भाटे व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
समाधीसोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रवचनात संत महिमा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.श्री.बापूसाहेब मोरे-देहूकर म्हणाले, “संत सेवा हीच भगवंताच्या प्राप्तीचे महाद्वार आहे. भगवंताच्या सेवेपेक्षाही संतांची सेवा श्रेष्ठ आहे. संत सेवेचा फायदा काय?तर त्यांच्या माध्यमातून देवापर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. देव हे भक्त वात्सल्य असतात तर संत हे जग वात्सल्य असतात म्हणून संताची महिमा ही शब्दात सांगता येत नाही. या सृष्टीवरील प्रत्येक संत हे स्वताच्या दुखांना विराम देऊन दुसर्यांचे दुख सावरण्यास पुढे येतात. त्यांना सुख, शांतीचा मार्ग दाखवितात.”
या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी आपली सेवा रूजू केली. यापुढेही वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम या विश्वरूप दर्शन मंचावर आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पर्यावरण स्वच्छता व निकोप, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी जनजागृती याद्वारे विज्ञान व अध्यात्म यांचा संगम होईल. पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थक्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व संतांनी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा असे प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यावेळी म्हणाले.
या सर्व कार्यक्रमांचे संयोजन प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे व डॉ. विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील कराड व प्रा.स्वाती कराड-चाटे यांनी केले.