पुणे – रुग्णाला असणा-या आजाराबाबत मनातील नकारात्मकता दुर्लक्षित करुन मानसिक शक्तीव्दारे आजारांवर नियंत्रण मिळविण्याचा मार्ग अध्यात्म दाखविते. रोगाचे भय त्याचे मुळ असते त्यासाठी हसणे हे उत्तम औषध आहे. व्याधीकडे देखील विनोदाने बघावे. जीवनात आनंद निर्माण करण्याचा मार्ग अध्यात्मातून जातो. अध्यात्मासाठी गुरु पाहिजे. मनावर ताबा मिळविण्याचा रस्ता गुरु नमनाव्दारे दाखवितो. गुरुंपुढे वमन केले जाते. गुरुंच्या सूचना पाळाव्या लागतात. त्याप्रमाणे रुग्णाने डॉक्टरांच्या सुचनांचे पालन केले तर कोणत्याही आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. असे मार्गदर्शन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.
जागतिक मधूमेह दिनानिमित्त मंगळवारी (दि. 14 नोव्हेंबर) भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथे डॉ. गायकवाड डायबेटिस सेंटरच्या वतीने डायबेटिस फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुमेह तज्ञ डॉ. अनु गायकवाड, डॉ. जयश्री तोडकर, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, दिगंबर ढोकले, लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष डॉ. दिपाली कुलकर्णी, सचिव सुदाम भोरे, खजिनदार अश्विनी भोसले, संतोष सोनावळे, अविनाश करपे, नगरसेवक विलास मडेगिरी, प्रियांका बारसे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.
लायन्स क्लबचे उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते नंदा फुगे यांना मधूमेह विजेता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी रक्तशर्करा तपासणी, डोळे व पायांच्या नसांची तपासणी, रक्तदाब, बीएमआय, बॉडी फॅट ॲनालायझर आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच डायबेटिक फुटवेअरची माहिती, मधुमेह माहिती पुस्तिका, सीडी देऊन मधुमेहाविषयी जनजागृती करण्यात आली.
डॉ. अनु गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रत्येक मधुमेही रुग्ण हा मधुमेह तज्ञ झाला तर मधुमेहावर विजय मिळविणे शक्य आहे. जीपीएसची (GPS=Grans,Potato,Suger) त्रीसुत्री अंमलात आणावी.
डॉ. जयश्री तोडकर यांनी बेरीयाट्रिक सर्जरी विषयी माहिती देताना सांगितले की, पंच्चानव टक्के लोकांना मधुमेह लठ्ठपणामुळे होते. लठ्ठपणा व मधुमेह हातातहात घालून येणारे आजार आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास शरीरातील इतर अवयवांना हानी पोहचते. ज्यांचा बीएमआय पंचवीस आहे अशी व्यक्ती लठ्ठपणाकडे वाटचाल करीत आहे. तर तीस बीएमआय असणारी व्यक्ती लठ्ठ समजली जाते. लठ्ठपणा हा आजार आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक तरुण, तरुणी लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. यामुळे नपुंसकत्व, वंध्यत्व, नैराश्य आणि हार्मोन्समध्ये अनैसर्गिक बदल होतात. लठ्ठपणाला वीस टक्के मनाचा ताबा तर एैंशी टक्के शरीराचा ताबा कारणीभूत असतो. असेही डॉ. तोडकर यांनी सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. अनु गायकवाड, सुत्रसंचालन दिगंबर ढोकले आणि आभार डॉ. शंकर गायकवाड यांनी मानले.