पुणे – ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ जाहीर झाले आहेत.
गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे चंद्रकांत दळवी (महसूल विभागीय आयुक्त, पुणे), मुकेश माचकर (महाराष्ट्राचे पहिले मतपोर्टल ‘बिगुल’ चे संपादक), सुवर्णा गोखले (ज्ञान प्रबोधिनी, स्त्री शक्ती प्रबोधन प्रमुख, ग्रामीण विभाग) आणि ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, कुरूंजी, ता. भोर,(ग्रामीण भागात पर्यावरणपूरक गृह बांधणी, पर्यटन प्रकल्पासाठी) यांची निवड या वर्षीच्या ‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’साठी करण्यात आली आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी ही माहिती दिली.
‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, कुरुंजी (ता.भोर) च्या वतीने संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर आणि अमृता देवगावकर सन्मान स्विकारतील.
‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ साठी व्ही. एन. जगताप (प्राचार्य, एम.सी.ई.सोसायटी ची ’इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी डिप्लोमा’) आणि खतीब अजाझ हुसेन (’हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’ चे कर्मचारी) यांची निवड करण्यात आली आहे.
‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान 2017’ चे वितरण ‘भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या असेंब्ली हॉलमध्ये गुरूवार, दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. यावर्षी पी.ए.इनामदार यांचा 73 वा वाढदिवस असून, सन्मानाचे नववे वर्ष आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व शाल असे या सन्मानाचे स्वरूप आहे.