टिम “येवा कोकणात”
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होऊ लागला. शेती उत्पन्नात घट आणि शेती उत्पादन खर्च वाढू लागला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. शेतक-यांनी स्वत:च्या तसेच राष्ट्राच्या हिताचा विचार करून सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आणि सर्वाच्याच फायद्याचे आहे.
स्वातंत्र्यानंतर आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न झाला, परंतु मागील दहा-पंधरा वर्षामध्ये देशात शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत; ही शेतीप्रधान देशातील चिंताजनक बाब आहे. इतकेच नव्हे तर जून, २०१७ मध्ये शेतकरी बांधवांना संपाचे हत्यार उपसावे लागले. जवळ-जवळ सात दिवस हा संप चालू होता. देशात पहिला शेतक-यांचा संप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘खोती पद्धती’ नष्ट करण्यासाठी १९२८ साली रायगड जिल्ह्यातील ‘चरी’ या गावी करण्यात आला होतो. हा संप सात वर्षे चालला. त्यामुळे ‘कूळ कायदा’ अस्तित्वात आला. मात्र, २०१७ च्या संपामुळे महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी तत्त्वत: मान्यता दिली आणि कर्जमाफी झालीही. तरी या कर्जमाफीचा फायदा किती शेतक-यांना झाला त्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु जमिनीची कमी-कमी होत जाणारी सुपीकता लक्षात घेऊन आज शेतक-यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
शेतक-यांना दुष्काळास तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध उपाय सुचविले होते. त्यापैकी ‘पीक विमा योजना’ होय. शेतजमिनीचे विभाजन म्हणजे, शेती व्यवसायाच्या अधोगतीचे कारण आहे. त्यासाठी शेतीक्षेत्रातील पीक उद्योगधंद्यात वळवले पाहिजे. त्यामुळे शेती व्यवसायातील दरडोई उत्तम वाढेल. शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतामध्ये गावातील शेती सर्व शेतक-यांनी मिळून पिकवावी. तिच्यासाठी भांडवली खर्च राज्य सरकारने करावा आणि शेतीतला माल निघाल्यावर त्याची वाटणी करारातील अटीनुसार शेतकरी व सरकारमध्ये व्हावी. परंतु त्या वेळच्या शासनाने राज्य समाजवादाच्या सिद्धांताकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज एक लाखापर्यंत कर्ज माफ करून, शासकीय कर्मचा-यांचे एका दिवसाचे वेतन शेतक-यांना देण्याचे आवाहन करण्याची वेळ राज्य शासनावर आली. जर त्यावेळच्या शासनाने राज्य समाजवादाचा सिद्धांत पाळला असता तर आज शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.
भारतीय शेती ही भारतीय लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. सध्या शेतीक्षेत्रावरील वाढता भार, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर आणि कमी होत जाणारी शेतीची उत्पादकता यामुळे शेत जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘सेंद्रीय शेती’ पद्धतीचा अवलंब करणे होय.
‘सेंद्रीय शेती’ पद्धतीचा विचार केला तर ‘सेंद्रीय शेती’ ही मूलभूत गरजांवर आधारित आहे. त्यासाठी सेंद्रीय शेती पद्धत शेतीप्रधान देशातील प्रत्येक शेतक-याने समजून घेऊन तिची अंमलबजावणी केली पाहिजे.
नवीन बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन देशात १९६६ नंतर हरित क्रांतीचे वारे जोराने वाहू लागले. तरी, त्यामध्ये सातत्य टिकविता आले नाही याचा परिणाम शेतकरी आत्महत्या करू लागले. आजही शेतक-यांच्या आत्महत्या शासनाला थांबवता आल्या नाहीत हे शासनाचे अपयश म्हणावे लागेल.
शेतक-यांच्या संपामुळे दीड लाखाची कर्जमुक्ती मिळाली मात्र यातून खरे शेतकरी कर्जमुक्त झाले का, हा खरा प्रश्न आहे. याला कोकणातील शेतकरी अपवाद आहेत. कारण कोकणातील शेतकरी प्रामाणिक आहेत. त्यांच्यामध्ये समयसूचकता असते. म्हणून तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत नाही. सध्या शेती उत्पादनावरील दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. जमिनीचा कस कमी होत चालला आहे. पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महागडे सावकारी कर्ज व बँकांकडून घेतलेले कर्ज, कमी उत्पादनामुळे कर्जाची परतफेड आणि घरखर्च चालविणे शेतक-यांना अशक्य झाले आहे. त्यात दलालदादांच्या चक्रवाढ व्याजामुळे शेतकरी आत्महत्या करू लागले.
आज शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा अवलंब करण्याची गरज नाही. त्यापेक्षा शेतीची सेंद्रीय पद्धतीने कशी लागवड करता येईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. केवळ शेतीविषयी माहिती देण्याचे काम शेतीदूत करीत असतील तर समाधान आहे. मात्र शेतक-यांबरोबर फोटो काढून वर्तमानपत्रांत प्रसिद्धी मिळविण्याचे काम न करता शासनाच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत कशा पोहोचतील आणि त्याचा फायदा कसा शेतक-यांना घेता येईल, असे प्रत्यक्ष काम शेतीदूताने करणे गरजेचे आहे.
आजही शेतक-यांसाठी स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना केली गेली तरी शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. फक्त मार्गदर्शन करून चालणार नाही तर त्यांचा उपभोग पण शेतक-यांना घेता आला पाहिजे. त्यासाठी शेतीचा विकास कसा होईल त्यासाठी एकमेव पारंपरिक पद्धत म्हणजे ‘सेंद्रीय शेती’ होय.
शेतक-यांमध्ये शेतीविषयक ज्ञानाचा अभाव आणि असंघटितपणामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोटय़ात चालला आहे. त्यामुळे शेतक-यांना खरी गरज आहे ‘सेंद्रीय शेती’ पद्धतीची.
सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे पाणी वाफ्यात टिकून राहते. बैल मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्याप्रकारे होते. अशी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास शेती उत्पादन वाढेल आणि खासगी सावकारांच्या दुप्पट व्याजाच्या चक्रातून शेतकरी मुक्त होईल. त्यामुळे सबसीडी देण्याची वेळ शासनावरती येणार नाही. त्यासाठी शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहोचतात काय? त्याचा फायदा शेतक-यांना होतो काय, याचा पाठपुरावा झाला पाहिजे, तरच, शेतक-यांना सुगीचे दिवस येऊन त्यांच्या आत्महत्या रोखता येतील.