पुणे : पुणे परिमंडलात महावितरणने थकबाकीदारांविरोधात सुरु केलेल्या विशेष मोहिमेत गेल्या पाच दिवसांत 52 हजार 262 ग्राहकांचा वीजपुरवठा 32 कोटी 23 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात ही कारवाई सुरु आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी (दि. 14) स्थानिक सुट्टी आहे. तथापि, थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करता यावा, यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहतील. तसेच थकबाकीदारांविरोधात मोहीमसुद्धा सुरु राहणार आहे.
वीजबिलांची थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने ‘शून्य थकबाकी’ची विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेच्या पाच दिवसांत रविवार (दि. 12) पर्यंत 52 हजार 262 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामधील 20 हजार 599 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.
पुणे शहरातील महावितरणच्या 7 विभागांतर्गत आतापर्यंत 43 हजार 424 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 21 कोटी 60 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांपोटी खंडित करण्यात आला आहे. यातील 19 हजार 173 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. भोसरी व पिंपरी विभागअंतर्गत पिंपरी व चिंचवड शहरात 1818 वीजग्राहकांचा वीजपुरवठा 2 कोटी 79 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर यातील 201 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. तसेच मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभाग अंतर्गत मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात 7020 ग्राहकांचा वीजपुरवठा 7 कोटी 84 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे. यात 1225 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.