पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा यंदाचा देखावा असलेल्या ब्रह्मणस्पती मंदिरावरील कळस उतरविताना क्रेन सर्व्हिसेस मधील राम जाधव (वय २९) यांना दिनांक २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अपघात झाला होता. रुबी हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन डॉ.आनंद काटकर यांच्याकडून संपूर्ण उपचार घेतल्यानंतर मंगळवारी (दि.१९) जाधव यांना डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून आल्यानंतर त्वरीत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांनी दगडूशेठ गणपती मंदिरात बाप्पाचे दर्शन घेत आरती केली.
यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने, राजेंद्र घोडके, बाळासाहेब रायकर, उल्हास भट यांसह विश्वस्त उपस्थित होते. गणेश विसर्जनाच्या आधी सांगता मिरवणुकीकरीता दगडूशेठ गणपतीची मुख्य देखाव्याशेजारील दोन्ही रस्त्यावरील सजावट उतरविताना हा अपघात झाला होता. कळसावरील घुमट क्रेनच्या सहाय्याने उतरविताना जाधव यांचा तोल गेल्याने ते अपघाताने खाली पडले होते.
गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांना मोठी इजा झाली नव्हती. जाधव यांच्यावर आवश्यक उपचार करुन ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आले. त्यांच्या उपचारांकरीता झालेला संपूर्ण वैद्यकीय खर्च दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे करण्यात आला.
राम जाधव म्हणाले, अपघात झाल्यानंतर त्वरीत रुबी हॉस्पिटलमध्ये मला उपचार मिळाल्याने माझे प्राण वाचले. हॉस्पिटलमध्ये मला उत्तम प्रकारचे उपचार मिळाले, त्यामुळे मी आज बरा होऊ शकलो. गणपती बाप्पाच्या कृपेने माझी प्रकृती स्थिर असून दगडूशेठ ट्रस्टने मला केलेल्या मदतीबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे.