पुणे – विविधरंगी पणत्या रंगविण्यासोबतच कागदी आकाशकंदील बनवून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. समाजातील वंचित-विशेष घटकांना देखील दिवाळीचा आनंद घेता यावा, याकरीता विविध सामाजिक संस्थांमध्ये या पणत्या आणि आकाशकंदील देण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी केला.
न-हे येथील पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष शार्दुल जाधवर, मुख्याध्यापिका रश्मी पाडगावकर यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
रश्मी पाडगावकर म्हणाल्या, दिवाळी उत्सवांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक वस्तूंनी वर्ग सजविले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. तसेच भारतीय संस्कृती व दिवाळीचे महत्त्व मुलांना समजावून सांगण्याकरीता प्रश्नमंजुषा स्पर्धेसारखे असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.