पुणे – “गणपत महाराज जगताप यांच्या जीवनावर लिहिलेला हा ग्रंथ खर्या अर्थाने वारकरी संप्रदायाला भूषणास्पद ठरणार आहे. जगताप यांचे जीवन हाच खरा संदेश आहे. नेत्रहीन असूनसुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, भगवद्गीता मुखोद्गत केलेली आहे. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ समाजाला योग्य दिशादर्शक ठरेल.”असे मत ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरूड, ठाकुरबुवा दैठणेकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 721 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहात कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून प्रज्ञाचक्षु ह.भ.प.श्री गणपत महाराज जगताप यांच्या जीवनावर सौ.उर्मिला विश्वनाथ कराड यांनी लिहिलेल्या दिव्यदृष्टीचा दैदिप्यमान ज्ञानदीप या ग्रंथाचेे प्रकाशन ह.भ.प.डॉ. दैठणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.े त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, प्रज्ञाचक्षु ह.भ.प. श्री गणपत महाराज जगताप, नानजीभाई ठक्कर ठाणावाला, ह.भ.प.नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर, पं. उद्धवबापू आपेगावकर, सुनील गायकवाड, डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर हे उपस्थित होते.
गणपत महाराज जगताप म्हणाले,“ माझ्यावर चरित्र ग्रंथ लिहावा, एवढा मोठा मी नाही, देवाने माझे चर्मचक्षू काढून घेतले, पण मला प्रज्ञाचक्षू दिले. मी केवळ माऊलीचा एक नम्र भक्त आहे. परंतू माझ्यावरील प्रेमापोटी उर्मिला काकूंनी हा चरित्र ग्रंथ लिहिला. खरे म्हणजे माझी जी प्रगती झाली, त्यात कराड साहेबांचा मोठा वाटा आहे. तेथून माझी वाटचाल होत राहिली व आज माझ्या सारख्या लहान माणसाचे चरित्र आज सर्वांसमोर येत आहे. ही सर्वस्वी माऊलीचा आर्शिवाद आहे.
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ गणपत महाराज जगताप यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ ब्रेल लिपित लिहून या जगातील दृष्टीहीनांसाठी सर्वात मोठे कार्य केले आहे. त्यांनी आपल्या प्रवचनातून समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला आहे. गुलाबमहाराज हे सुद्धा दृष्टीहीन असतांना त्यांनी 135 ग्रंथाचे निर्माण केले आहे आणि त्याच कार्याचा वसा गणपत महाराज पुढे चालवित आहेत. गणपत महाराज यांना संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असून त्याचे अनुकरण करण्यास वारकर्याना सदैव प्रेरित करीत असतात.”
नानजीभाई ठक्कर ठाणावाल म्हणाले,“दिव्यदृष्टीचा दैदिप्यमान ज्ञानदीप हा पवित्र ग्रंथ आहे. यामध्ये गणपतत महाराज जगताप यांच्या संपूर्ण जीवनाचे रहस्य उलगडले आहे. लहानपणापासून ते आतापर्यंतच्या त्यांच्या कार्याच्या आढावा ओव्यांच्या स्वरूपात लेखिका सौ.उर्मिला विश्वनाथ कराड यांनी घेतला आहे. अचानक दृष्टी गेल्यानंतर त्यांनी परिस्थितीला खचून न जाता अध्यात्माच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.”
लेखिका सौ.उर्मिला विश्वनाथ कराड म्हणाल्या,“गणपत महाराज यांच्या आचरणाकडे पाहूण मी त्यांचे शिष्यपद स्विकारले. त्यानंतर त्यांच्या जीवनाचा प्रवास ऐकून मी दंग झाले. लहानपणी देवीच्या साथीने वयाच्या आठव्या वर्षी अचानक दृष्टी गेल्यानंतरही त्यांनी परिस्थितीपुढे हार मानली नाही. आपल्या जीवनाचे शिल्पकार फक्त संत ज्ञानेश्वर आहेत हे लक्षता ठेऊन त्यांनी फक्त ऐकून संपूर्ण ज्ञानेश्वरी, गाथा, भगवद्गीता पाठ करून वारकर्यांना आपल्या प्रवचनातून सतत मार्गदर्शन करीत आहेत.”
या कार्यक्रमानंतर आळंदी देवाची येथील वै.ह.भ.प. दादा महाराज साखरे फडाचे प्रमुख व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प.श्री. किसन महाराज साखरे यांचे कीर्तन झाले.
इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील हजारो भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घेतला. ह.भ.प.शालीकराम खंदारे व ह.भ.प.डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी सूत्रसंचालन केले. ह.भ.प.श्री. महेश नलावडे यांनी आभार मानले.