रत्नागिरितील गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५२वे कोंकण प्रदेश अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन साहित्यिक तथा राष्ट्रीय सुरक्षा विषयक तज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. गोव्यातून ५० विद्यार्थी या अधिवेशनात सहभागी झाले होते.
तत्पूर्वी प्रा. मंदार भानुशे यांची अभाविप कोंकण प्रदेश अध्यक्ष तर अनिकेत ओव्हाळ यांची प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली. गोगटे कॉलेज ते महालक्ष्मी चौक पर्यंत काढलेली भव्य शोभायात्रा अधिवेशनाचे खास आकर्षण ठरले. खुल्या अधिवेशनात विद्यार्थी नेत्यांनी शैक्षणिक,सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर आपली मते मांडली.
अधिवेशनात कोंकण आणि गोव्याला संबंधित असे काही प्रस्ताव पारित करण्यात आले.गोव्याचे ऋषिकेश शेटगांवकर यांनी मांडलेल्या एका प्रस्तावावर विचार विनिमय करताना गोव्यात भारतीय संस्कृतीवर होणार्या अराष्ट्रीय विचारांच्या मारावर लक्ष वेधण्यात आले. पोर्तुगीज विचारसरणीचे काही अराष्ट्रीय घटक गोवा मुक्त करताना भारताने गोव्यावर आक्रमण केले असे मानतात.याचा येथे विरोध करण्यात आला. गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्ट बाळगणारे व्यक्तींच्या मतदान अधिकारावर पुनर्विचार व्हावा असे मत या अधिवेशनात व्यक्त करण्यात आले.
इतर प्रस्तावांमध्ये गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका खुल्या करण्याची मागणी करण्यात आली. सदर निवडणुका १० दिवसांच्या आत आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपा शिवाय पार पडल्या पाहिजेत.विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची’फोटो-कॉपी’उपलब्ध व्हावी तसेच पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सोपी व सोयीस्कर करावी अन्यथा विद्यापीठाला आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला.