पुणे – समाजाच्या अंधा-या कोप-यामध्ये स्वत:च्या आयुष्याकरीता आशेचे किरण शोधणा-या चिमुकल्यांचा वाढदिवस बालदिनाच्या निमित्ताने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. एरवी चित्रविचित्र दृश्य पाहून जगणा-या या मुलांच्या आयुष्यात आज रंगीबेरंगी फुग्यांनी सजलेला परिसर डोळ्यात साठविण्याची संधी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपलब्ध करुन दिली. देहविक्री करणा-या महिलांच्या मुलांचे वाढदिवस बालदिनाच्या दिवशी साजरे होत असताना या महिलांसह उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा देखील आनंदाश्रूंनी पाणावल्या.
निमित्त होते, गुरूवार पेठेतील वीर शिवराज मंडळ, बालकल्याणकारी सेवा संस्था व क्रांतीज्योती महिला विकास संस्था यांच्यावतीने बालदिनाचे औचित्य साधून स्वाधार मोहोर संस्थेत आयोजित कार्यक्रमाचे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण सोनिवाल, बालकल्याणकारी सेवा संस्थेचे मोहित झांजले, क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या सोहनी डांगे, स्वाधार मोहोरच्या संजीवनी हिंगणे, चैतन्य सिन्नरकर, सचिन चव्हाण, मंगेश शहाणे, अक्षय पानसरे, तुषार शेलार आदी उपस्थित होते.
अनेकदा स्वत:च्या वाढदिवसाची तारीख देखील माहिती नसलेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या त्या चिमुकल्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याकरीता कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. देहविक्री करणा-या महिलांच्या मुलांसाठी काम करणाºया स्वाधार, मोहोर संस्थेतील मुलांनी केक कापत बालदिनाबरोबरच आपल्या मित्रमंडळींचा वाढदिवस देखील जल्लोषात साजरा केला. कार्यक्रमादरम्यान पंडित नेहरू यांना रंगावलीतून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बालदिनाचे महत्व आणि पंडित नेहरूंची माहिती मुलांना दिली.
किरण सोनिवाल म्हणाले, प्रत्येक मुलाचा वाढदिवस त्याचे पालक अत्यंत उत्साहात साजरा करतात. परंतु देहविक्री करणाºया महिलांच्या मुलांसाठी एकत्रितपणे बालदिनी वाढदिवस साजरा करावा, हा यामागील उद्देश होता. या मुलांसाठी काम करणाºया अनेक संस्था आहेत. परंतु वाढदिवस म्हणजे काय हे समजून घेण्यासोबतच वाढदिवस साजरा करण्याचा आनंद या मुलांना मिळतोच असे नाही. त्यामुळे तो आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही गणेशोत्सव मंडळाच्यामार्फत केला आहे. निवेदक बाळकृष्ण नेहरकर यांनी मुलांचे विविध खेळ घेत मनोरंजन केले.