पुणे : भारतात जाती प्रथा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. ज्या व्यवस्थेमुळे समाजातील लोकांना त्रास सहन करावा लागतो, अशा व्यवस्थेला आपण का स्थान दिले आहे. धर्म आणि जाती-पातीच्या या व्यवस्थेमुळे लोकांचा आत्मसन्मान पांगळा होत आहे. तरीही ही व्यवस्था का नष्ट होत नाही, हा प्रश्न कायम आहे. जाती व्यवस्थेमुळे आज समाज विखुरलेला आहे. त्यामुळे आपली ताकद दिसत नाही. जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असलेला अद्भूत असा भारत देश असूनही आपण अशा देशाची धर्मा आणि जाती-पातींमध्ये विभागणी का करीत आहोत, असा सवाल लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी व्यक्त केला.
‘स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम’ या डॉ. विकास आबनावे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन मीराकुमार यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, डॉ.विकास आबनावे, अविजित अंशुल, डॉ. नफेसिंह खोबा, त्रिमोहन कुमार, मनोज कुमार, दिलीप आबनावे, राजेश आबनावे, शिरीष आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, प्रकाश आबनावे प्रसाद आबनावे आदी उपस्थित होते.
मीरा कुमार म्हणाल्या, बाबू जगजीवनराम यांनी ८२ वर्षापूर्वी सन १९३५ साली दलितांच्या मंदिर प्रवेशाबाबतचा लढा पुण्यातूनच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविला होता. यावेळी जातीपातीविरोधात झालेल्या या क्रांतीनंतर अनेक मंदिराचे दरवाजे समाजातील प्रत्येकासाठी खुले झाले. परंतु आजही अनेक मंदिराचे दरवाजे बंद आहेत. अजूनही क्रांती संपली नाही. त्यामुळे पुणेकरांनी ही क्रांतीची ज्वाला तेवत ठेवावी.
त्या पुढे म्हणाल्या, महिला, दलित, गरीब लोकांसाठी सरकार अनेक योजना राबविते. योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांच्यावर कोणतेही उपकार करत नाही. या समाजघटकांनी त्यांचे बलिदान स्वातंत्र्यलढ्यात दिले आहे. त्यामुळे जे मागे राहिले आहेत, त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ अणि नवीन भारत घडवू. स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम या पुस्तकातून नवीन पिढीला योग्य मार्ग मिळेल, त्यासाठी प्रकाशस्तंभाचे काम हे पुस्तक करेल, असेही त्यांनी सांगितले.
उल्हासदादा पवार म्हणाले, राजमाता जिजाऊ, इंदिरा गांधी, मीराकुमार यांसारख्या कर्तृत्ववान महिलांचा बौद्धीक वारसा भारताला मिळाला आहे. सुमारे १२५ कोटी लोकसंखेच्या देशात १६ वर्षे इंदिरा गांधी यांनी राज्य केले आणि पंतप्रधान कसा असावा याचा आदर्श घालून दिला. मोहन जोशी म्हणाले, १९७१ च्या युद्धात बाबू जगजीवनराम यांचे मोठे योगदान होते. सैनिकांना भेटून त्यांनी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागविला. आजच्या बदललेल्या परिस्थितीत त्यांच्या विचारांची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ.विकास आबनावे म्हणाले, बाबू जगजीवनराम यांची स्वातंत्र्यसेनानी आणि देशाचे माजी उपपंतप्रधान म्हणून सर्वदूर ओळख आहे. मात्र, देशाच्या स्वातंत्र्यलढयातील त्यांचे योगदान, सामाजिक प्रश्नांवरील कार्य आणि स्वातंत्र्योत्तर राजकारणात देशाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने उचलेली पाऊले याविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे त्याविषयी सविस्तर लेखन करुन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा प्रयत्न पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ.सुमीता सातारकर यांनी देवीस्तवन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. नीता गुमास्ते यांनी प्रास्ताविक केले. डॉ. छाया आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती हिरे यांनी आभार मानले.