धार्मिक वास्तुकलेचा नमुना संगमेश्वरचे कर्णेश्वर मंदिर

August 18th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

विवेक ताम्हणकर

कोकणातील अनेक मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. आज जमीनदोस्त झालेल्या या मंदिरांमध्ये अप्रतिम कलाकृती साकारल्या गेल्या होत्या. मंदिराची झालेली दुरावस्था आणि नामशेष होत चाललेली प्राचीन कलाकृती याकडे सरकार , पुरातत्त्व खाते किंवा अभ्यासक यांचे लक्ष नाही. त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा नमुना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
कोकणला ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: उभारलेले गडकिल्ले आणि काही मंदिरे वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणून आपल्याला अभ्यासता येतो. सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यामध्ये विमलेश्वर मंदिर, कुणकेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर आदी वास्तुकलेची सुंदर उदाहरणे आहेत. सातव्या शतकात कोकणापर्यंत चालुक्य राजवट होती. राजा कर्णराज याने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या कसबा गावात प्रतिकाशी निर्माण करण्याच्या विचाराने शंकराची बारा मंदिरे बांधली. शंकरभक्त कर्णराजाने हेमाडपंथी वास्तुकलेत बांधलेल्या या मंदिरापैकी फक्त दोन-तीन मंदिरे आज याठिकाणी सुस्थितीत आहेत. उर्वरित सर्व मंदिरे मानवी दुर्लक्षामुळे जमीनदोस्त झालेली आहेत.
संगमेश्वर गावाला पुरातन काळापासून फार महत्त्व आहे. पुराणात संगमेश्वर महात्म्य म्हणून संगमेश्वरबाबतचे महत्त्व आढळते. सातव्या शतकातील चालुक्य राजवटीत शंकरभक्त कर्णराजा याला संगमेश्वरचे नैसर्गिक सौंदर्य फारच भावले. त्यामुळे त्याने
संगमेश्वरच्या कसबा गावामध्ये प्रतिकाशी बनवायचा संकल्प केला. शंकराची छोटी-मोठी मिळून बारा मंदिरे बांधली. मंदिराचे सर्व बांधकाम काळ्या दगडामध्ये करण्यात आलेले आहे. अलकनंदा नदी व शास्त्री नदीच्या काठावर संगम मंदिराचे बांधकाम केले. सूर्यनारायण मंदिरही बांधले. आजच्या घडीला या दोन मंदिरांसोबत मुख्य कर्णेश्वर मंदिर मिळून बारापैकी तीन मंदिरे सुस्थितीत उभी आहेत.
संगमेश्वरमधून वाहणाऱ्या शास्त्री आणि सोनवी नदीच्या संगमामुळे त्या गावाला संगमेश्वर हे नाव पडले. सभोवताली हिरवेगार डोंगर आणि बारमाही वाहणाऱ्या नद्या, सुंदर-सुंदर ठिकाणे, बारमाही पिकणारी शेती ही या भागातली श्रीमंती आहे. संगमेश्वरला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कसबा गावातच सरदेसाईंच्या वाडय़ात संभाजी महाराज आलेले असताना शत्रूला कानोसा लागला आणि याच ठिकाणी संभाजी महाराजांना कैद करण्यात आले. गुप्तहेराने सूचित करूनही या कोकणात शत्रू कसा येणार यावर विश्वास नसलेले महाराज वाडय़ातच बसून राहिले आणि शत्रूच्या तावडीत सापडले. संभाजी महाराजांच्या काळात न्याय-निवाडय़ाची कामे या सरदेसाईंच्या वाडय़ात चालायची. महाराष्ट्रातील मराठय़ांचा इतिहास ज्या जागेवर बदलला, संभाजी महाराज जिथे बंदिवान झाले त्या जागेतील सरदेसाईंचा वाडा उद्ध्वस्त झालेला आहे. मात्र वाडय़ाच्या चौथऱ्याच्या काही खाणाखुणा पाहायला मिळतात. या जागेत येथील लोकांनी घाण, मानवी विष्ठा टाकून पवित्र जागा अपवित्र करून टाकली आहे. येथील रस्त्याला ‘संभाजी महाराज पथ’ म्हणून नाव दिलेले आहे. एवढीच काय ती संभाजी महाराजांची ऐतिहासिक ओळख येथे पाहायला मिळते. याच ऐतिहासिक जागेशेजारी सातव्या शतकात बांधलेली शंकराची मंदिरे आहेत.
या बारा मंदिरांपैकी कर्णेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. हेमांडपंथी वास्तुकलेतले हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात कोरलेल्या दगडांनी बनविलेले आहे. सुंदर नक्षीकाम, देवतांची चित्रे, दगडात कोरून त्यांना अत्यंत कलात्मकरित्या मंदिराच्या भिंतीमध्ये बसवलेले आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश करताच समोरच वर्तुळाकार नक्षी पहायला मिळते. मंदिराच्या चारही दरवाजांमध्ये अशा प्रकारच्या वर्तुळाकार नक्षी आहेत. डोक्यावर दगडात कोरलेला सुंदर झुंबर पाहायला मिळतो. प्रवेशद्वारात डोक्यावरच आठही कोनांमध्ये अष्टदिक्पालांच्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश केल्यानंतर येथील खांबांचे नक्षीकाम डोळ्यात भरते. या खांबांची रचना कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिरातील नक्षीकामाशी जुळते. मंदिरात अत्यंत कलात्मक अशी नंदीबैलाची मूर्ती आहे. गाभाऱ्यात शंकराची एक फूट उंच िपडी पाहायला मिळते. मंदिरातील एका खांबावर शिलालेखही आढळून येतो. हा शिलालेख प्राचीन हस्तकलेत कोरलेला आहे. मंदिराच्या खांबांवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. कोरीव कामातील आणि हस्तकलेतील राखलेले तारतम्य आणि निर्माण केलेली कलाकृती त्यावेळच्या कलानिर्मितीचे सुंदर चित्र आपल्यासमोर उभे करते. त्या मंदिराच्या कलाकुसरीनुसार आणि या मंदिराच्या कलेशी साधम्र्य असलेली उर्वरित सर्व मंदिरे पाहायला मिळतात. कर्णेश्वर मंदिराच्या परिसरातच सूर्यनारायणाचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला कर्णेश्वर मंदिरात मोठा उत्सव होतो. वर्षभर मोठय़ा संख्येने भाविक या ठिकाणी भेट देतात. त्याशिवाय परदेशातील अनेक पर्यटक हे मंदिर पाहायला येतात. काही लोक या वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी मुद्दामहून या ठिकाणी येतात. कसबा येथील मंदिरांमध्ये असलेल्या सुंदर मूर्त्यां आणि खांबांवरील कोरीव काम केलेल्या दगडांना आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये किंमत आहे. मात्र ही लाखो रुपयांची संपत्ती आज जमिनीमध्ये सडत पडली आहे.
कोकणमध्ये अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. गोवा राज्यामध्ये, राजस्थान राज्यामध्ये असे ऐतिहासिक ठेवे जपून त्याचा पर्यटनदृष्टय़ा व्यावसायिक वापर करून घेण्यात आला. गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी बांधलेले चर्च आजही पर्यटकांचे आकर्षण स्थान आहे. लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. किंबहुना या दोनही राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, असं म्हणण्यापेक्षा या पर्यटन व्यवसाय निर्मितीसाठी या राज्यांनी हे ऐतिहासिक ठेवे यामध्ये मंदिरे, चर्च, ऐतिहासिक वास्तू जपल्यात. त्याची पुनर्बाधणी केली आणि आजच्या पिढीसमोर इतिहास ठेवण्यात यश मिळविले. मात्र दुर्दैवाने पौराणिक वारसा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात पर्यटनाच्या नावाने फक्त बोंब मारली जाते. मात्र पर्यटन रुजविण्यासाठी आणि आमचा इतिहास पुढच्या पिढीला सांगण्यासाठी काहीही केले जात नाही. याचे सुंदर उदाहरण संगमेश्वरमधील कसबा गावातील शंकराच्या मंदिराची झालेली अवस्था हे आहे. प्राचीन कलाकृतीमधल्या वस्तुंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये किंमत मिळते. संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावात आज जमीनदोस्त झालेल्या मंदिरांमध्ये आणि मंदिराच्या दगडांमध्ये अप्रतिम कलाकृती साकारलेल्या आहेत. याकडे अद्यापही तस्करांचे लक्ष गेलेले नाही. म्हणून या कलाकृती इथे पडलेल्या पाहायला मिळतात. मंदिरांची झालेली दुरावस्था आणि नामशेष होत चाललेली प्राचीन कलाकृती याकडे सरकार, पुरातत्त्व खाते किंवा अभ्यासक लक्ष देत नाहीत. त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा नमुना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वास्तुकलेचा वारसा टिकावा म्हणून.. – जितेंद्र पराडकर (सामाजिक कार्यकर्ते)
कसब्यामधील कलात्मक मंदिरे ही संगमेश्वरची पौराणिक ओळख आहे. याबाबत आपण व आपल्या मित्रांनी अनेक पातळ्यांवर आवाज उठवला. मात्र कोणीही दाद घेत नाही. या अमूल्य ठेव्याच्या संरक्षणासाठी शासनाच्या पुरातत्त्व खात्याने स्थानिकांना संघटीत करून त्यांच्यावर हा ठेवा जोपासण्याची जबाबदारी द्यावी, असे मत जितेंद्र पराडकर या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पराडकर यांनी हा वास्तुकलेचा नमुना वर्षांनुवर्षे टिकून भावी पिढीला संगमेश्वरचे पौराणिक महत्त्व कळावे यासाठी प्रयत्न चालवले आहेत. चित्रकलेच्या माध्यमातून देखील ते येथील चित्रकलाविषयक ओढ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी काम करतात.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions